सांस्कृतिक महोत्सवामुळे विद्यार्थ्यांना नवी उर्जा मिळते : उपायुक्त सचिन सांगळे
अनिल ठाणेकर
ठाणे : एरव्ही शाळेच्या गणवेषात असलेली मुले सांस्कृतिक महोत्सवानिमित्त विविध वेशभूषेमध्ये नटलेली पाहून मला माझे बालपणीचे दिवस आठवले. वर्षभर अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक महोत्सवाची आवश्यकता आहे, अशा महोत्सवांमुळे विद्यार्थ्यांचा ताणतणाव कमी होऊन त्यांना नवी उर्जा मिळते, नवे मार्ग सापडतात. त्याचबरोबर कलाही जोपासले जात असल्याचे मत शिक्षण विभागाचे उपायुक्त सचिन सांगळे यांनी मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.
ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागामार्फत मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सव व स्पर्धा २३ व २४ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या. या महोत्सवाचे उद्घाटन समारंभ २३ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक २३ किसन नगर येथे झाले. यावेळी उपायुक्त सचिन सांगळे, प्रभारी शिक्षणाधिकारी शेषराव बडे, गटाधिकारी संगीता बामणे या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सांस्कृतिक महोत्सवाच्या कार्याध्यक्ष सविता चौधरी व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.सलग दोन दिवस सुरू असलेल्या या सांस्कृतिक महोत्सवांमध्ये नृत्य आणि नाट्य विभाग अशा दोन प्रकारांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या. नृत्य विभागात इयत्ता पहिली ते पाचवीच्या एकूण ३०, इयत्ता सहावी ते आठवीच्या एकूण ४६ शाळांनी तर नाट्य विभागांमध्ये २६ अशा एकूण १०२ शाळांमधील एकूण २००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. महोत्सवामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी पूर्व प्राथमिक आणि इयत्ता सहावी ते आठवी उच्च प्राथमिक अशा दोन विभागांमध्ये नृत्य स्पर्धा तसेच इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी नाट्य स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धा अनुक्रमे ठाणे मनपा शाळा क्रमांक १३ खोपट, ठाणे मनपा शाळा क्रमांक २३ किसननगर, आणि ठाणे मनपा शिक्षण विभाग कार्यालय तळमजला हॉल विष्णुनगर, नौपाडा या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या.कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ठाणे मनपा शाळा क्रमांक १२० या शाळेचे शिवशंभू गीत सादर करण्यात आले. या सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धेतील सर्व कार्यक्रमांचे विभागवार परीक्षण होऊन नृत्य, नाट्य विभागातून बक्षीस पात्र कार्यक्रम निवडण्यात आले असून त्यांचे सादरीकरण मध्यवर्ती सांस्कृतिक महोत्सवात होणार आहे. या संपूर्ण महोत्सवाचे आयोजन आणि नियोजन सांस्कृतिक समिती २०२५ – २६ ने अतिशय नेटकेपणाने केले होते. त्यामुळे एकाच वेळेस तीन ठिकाणी सुरू असलेल्या या स्पर्धा उत्तमरीत्या पार पडले.स्पर्धेचा निकाल – इ.१ ते ५ नृत्य स्पर्धा : प्रथम क्रमांक- शाळा क्रमांक ५३, द्वितीय क्रमांक- शा.क्र ५६, तृतीय क्रमांक- शा.क्र ६४, उत्तेजनार्थ १ -शा.क्र ९६, उत्तेजनार्थ २ -शा.क्र २६ इ. ६ ते 8 नृत्य स्पर्धा निकाल – प्रथम क्रमांक- शा.क्र ५९, द्वितीय क्रमांक- शा.क्र १8, तृतीय क्रमांक- शा.क्र २५, उत्तेजनार्थ १- शा.क्र १०२, उत्तेजनार्थ २ -शा.क्र २२. इ.१ ते 8 वी नाट्यस्पर्धा निकाल – प्रथम क्रमांक- शा.क्र ११, द्वितीय क्रमांक- शा.क्र १४, तृतीय क्रमांक- शा.क्र ६, उत्तेजनार्थ १- शा.क्र १२५, उत्तेजनार्थ २ – शाळा क्र. ४०
