साहित्य रसिकांना सहभागाचे आवाहन

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ठाणे, ठाणे जिल्हा ग्रंथालय संघ आणि प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय वाशी नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने २८ व २९ डिसेंबर २०२५ रोजी वाशी सेक्टर ६ येथे साहित्य मंदिर सभागृहात ‘ठाणे ग्रंथोत्सव – २०२५’ साजरा होत असून यामधील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून तसेच ग्रंथ प्रदर्शनातून साहित्य रसिकांना पर्वणी उपलब्ध होणार आहे.

रविवार, २८ डिसेंबर, सकाळी १०.०० वाजता माजी ग्रंथालय संचालक मो.भु.मेश्राम यांच्या शुभहस्ते, सुप्रसिध्द साहित्यिक राजीव श्रीखंडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रंथोत्सवाचा शुभारंभ होणार असून याप्रसंगी ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, ग्रंथालय संचालक अ.मा.गाडेकर, कोकण विभागीय ग्रंथालय संघ अध्यक्ष दिलीप कोरे, प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालयाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष कवी अरुण म्हात्रे व ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चांगदेव काळे आदी मान्यवर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील हे ठाणे ग्रंथोत्सवाचे निमंत्रक आहेत.

शुभारंभापूर्वी सकाळी ८ वाजता नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांच्या शुभहस्ते ‘ग्रंथदिंडी’ काढली जाणार असून शुभारंभ कार्यक्रमानंतर सकाळी ११ ते १२ यावेळेत ‘कृत्रिम बुध्दीमत्ता आणि ग्रंथालये’ या विषयावर लोकमतचे माजी संपादक सुकृत खांडेकर, गणितज्ञ डॉ. विवेक पाटकर आणि निर्मल सामंत प्रभावळकर परिसंवादात सहभागी होणार आहेत. त्यानंतर ‘पुस्तकवाल्यांचे वाचनवेड’ या विषयावरील परिसंवादात सुप्रसिध्द सा‍हित्यिक गणेश मतकरी, पंकज भोसले व मकरंद जोशी ‘पुस्तक गप्पा’ मारणार आहेत. दुपारी ३ ते ५ या वेळेत शासन परिपत्रकांची अंमलबजावणी आणि ग्रंथालय पदाधिकारी व ग्रंथपाल यांचे मनोगत आयोजित करण्यात आले आहे.

ठाणे ग्रंथोत्सवाच्या दुस-या दिवशी ‘वाचन संस्कृती: काल, आज व उद्या’ या परिसंवादात अरविंद पाटकर, किरण येले, अनंत देशमुख आदी नामवंत साहित्यिक विचार प्रकट करणार आहेत. सकाळी ११.३० ते ०१.०० यावेळेत संदीप जंगम ‘गोष्ट महाराष्ट्राची’ या संहितेचे अभिवाचन करणार आहेत. यंदाचे वर्ष कविवर्य नारायण सुर्वे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने सुप्रसिध्द कवी अरुण म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ३ ते ४.३० या वेळेत आयोजित ‘काव्यांजली या विशेष कवी संमेलनात नामवंत कवी साहेबराव ठाणगे, गीतेश ‍शिंदे, रविंद्र पाटील, आदित्य दवणे, मोहन काळे, मानसी जोशी, नारायण लांडगे पाटील सहभागी होणार आहेत. सायं. ४.३० ते ५.३० या वेळेत सुनिता रामचंद्र, सुप्रिया हळबे, दिलीप जांभळे हे गजलकार ‘गजलसंध्या’ सादर करणार आहेत.

संध्याकाळी ६ वाजता ठाणे जिल्ह्रयातील आदर्श ग्रंथपाल व उत्कृष्ट वाचक यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. यामध्ये चांगदेव काळे, विद्याधर ठाणेकर, विनायक गोखले, सुभाष कुलकर्णी आदी वाचन संस्कृतीसाठी अथक कार्यरत असणा-या मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे.

२८ व २९ डिसेंबर या दोन दिवशी संपन्न होणा-या ‘ठाणे ग्रंथोत्सव – २०२५’ मध्ये साहित्य रसिकांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन ग्रंथोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष प्रशांत पाटील व सदस्य नवी मुंबई महानगरपालिका जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे, शिक्षण अधिकारी अशोक कडूस, प्रकाशक संघटनेचे सदस्य सुमित लांडे, ठाणे जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष चांगदेव काळे, साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष अरुण म्हात्रे, प्रा.माणिकराव कीर्तने वाचनालयाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी आणि सर्व संयोजन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *