४५ वर्षांच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच असा प्रकार पाहतोय — मुजफ्फर हुसेन

मतदारयादी गायब, निवडणूक जाहीर- काँग्रेसची तीव्र टीका

मिरा – भाईंदर : अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्याआधीच निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याबद्दल कॉंग्रेसने निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. यामुळे मोठा गोंधळ होणार असून अनेक इच्छुक उमेदवार निवडणूक लढवू शकणार नाही, अशी भीती कॉंग्रेसने व्यक्त केली आहे.

निवडणूक आयोगाने आधी अंतिम मतदारांची यादी प्रसिध्द करून नंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे अपेक्षित असते. मात्र यंदा निवडणूक कार्यक्रम आधीच जाहीर झाला असून प्रभागनिहाय अंतिम यादी २८ डिसेंबर रोजी प्रसिध्द होणार आहे. यामुळे इच्छुकांना आपले नाव कुठल्या प्रभागात आहे ते स्पष्ट नसल्याने अर्ज भरता येत नाही. २८ डिसेंबरला अंतिम यादी आणि ३० डिसेंबरला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसात अर्ज भरण्यासाठी गर्दी होऊन गोंधळ उडेल आणि अनेक इच्छुक अर्ज भरू शकणार नाही.

याबाबत कॉंग्रेसने निवडणूक आयोगावर जोरदार टिका केली आहे. माझ्या ४५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाचा असा प्रकार घडला आहे. याबाबत निवडणूक आयोगाचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवायला हवे असा टोला कॉंग्रेसने नेते मुजफ्फर हुसेन यांनी लगावला आहे. भाजपाकडून वारंवार आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे. त्याबाबत अनेक तक्रारी करूनही निवडणूक आयोग कसलीच कारवाई करत नसल्याचा आरोप हुसेन यांनी केला आहे.

एमआयएम, वंचितला खुले आव्हान

एमआयएम पक्ष यंदा निवडणूक लढविणार आहे. त्यांनी केवळ मुस्लिम प्राबल्य असलेल्या ठराविक मतदारसंघात न लढता सर्व प्रभागात निवडणूक लढवाली असे आव्हान त्यांनी दिले. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते भाजप सोबत असतात त्यामुळे या दोन्ही पक्षांचा उद्देश केवळ मतविभाजन करण्याचा आहे, असाही आरोप मुजफ्फर हुसेन यांनी केला. महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *