ठाणे : ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत युती जाहिर होण्यापुर्वीच ‘नमो भारत, नमो ठाणे’च्या पोस्टरबाजीने प्रचाराला सुरुवात केली. शिंदे सेना यामुळे अस्वस्थ असतानाच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही या पोस्टर बाजीत उतरली आहे.
मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी ‘मौन भारत, मौन ठाणे’ अशा आशयाचे पोस्टर तयार करुन ठाण्यातील समस्यांविषयी टीका केली आहे. तसेच आता तरी जागा हो ठाणेकर असेही जाधव यांनी म्हटले आहे.
ठाणे शहरातील तीन हात नाका परिसरात भाजपचे पदाधिकारी ॲड. हेमंत म्हात्रे यांनी मोठा बॅनर लावला होता. या बॅनरवर ‘नमो भारत, नमो ठाणे असा मजकूर लिहीण्यात आला असून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र आणि कमळ निशाणी आहे.या पोस्टर बाजीवर ‘आमचं अर्ध आयुष्य ट्रॅफीकमध्ये संपतंय.. मौन भारत, मौन ठाणे’, ‘टँकरने पाणी भरतोय.. नगरसेवकांची पोट भरतोय..मौन भारत, मौन ठाणे’ असे अविनाश जाधव यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहीले आहे. आता तरी जागा हो ठाणेकर !!!! असाही त्यामध्ये उल्लेख आहे.
