अरविंद जोशी

मिरा – मिरा भाईंदर मध्ये शिवसेना भाजप महायुतीतील वाद कमालीचा विकोपाला गेला आहे. भाजप महायुती करण्यास टाळाटाळ करत असल्याने शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी भाजपला निर्वाणीचा इशारा दिला आहे. अर्ज भरण्यासाठी शेवटचे दोन दिवस उरले असल्याने २४ तासात युती बाबत बोलणी करा, अन्यथा आम्ही वेगळा निर्णय घेऊ असा अल्टिमेटमच प्रताप सरनाईक यांनी भाजपला दिला आहे. तर दुसरीकडे आज भारतीय जनता पक्षाचे मिरा भाईंदर जिल्हा उपाध्यक्ष नवीन सिंह ठाकूर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश देत भाजपवर कुरघोडी करण्याचाही प्रयत्न केला आहे.

 युती बाबत चर्चा होत नसल्याने सरनाईक यांनी रविवारी पत्रकार परिषद घेईन भाजपला निर्वाणीचा इशारा दिला आहे. अर्ज भरण्यासाठी दोन दिवस असल्याने पुढील २४ तासात निर्णय घ्या, अन्यथा आम्ही स्वतंत्र लढू असे त्यांनी संगीतले. मी भाजपच्या नरेंद्र मेहता यांच्या फोनची वाट बघत आहे, असेही त्यांनी सांगितले.

युती करण्यासाठी मेहता यांनी दोन अटी ठेवल्या होत्या। शिवार उद्यानाचा ठेका रद्द करून पालिकेला जागा हस्तांतरित करावी, आणि शिवसेनेने घेतलेले भाजप कार्यकर्ते परत कराव्या असे मेहता म्हणाले होते. त्यावरही सरनाईक यांनी खुलासा केला. शिवार उद्यानाचा ठेका २००४ मध्ये भाजप नगररसेवकांच्या आणि नरेंद्र मेहता यांच्या सहीने झाला होता, असे ते म्हणाले. तुम्ही आमचे घेतलेले ४ नगरसेवक परत करा आम्ही तुमचे कार्यकर्ते परत करू असेही ते म्हणाले.

दोन दिवसांपूर्वी हा वाद मिटवण्यासाठी आणि सकारात्मक निर्णय घेण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून दोन्ही पक्षांचे प्रत्येकी तीन सदस्य असलेली समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती.
या समितीच्या पहिल्या बैठकीत शिवसेनेकडून ठाण्याच्या धर्तीवर युती करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र मागील आठ वर्षांत शहरात भाजपचा वाढलेला मतदार आणि इतर राजकीय गणित लक्षात घेता, शिवसेनेला जास्तीत जास्त १३ जागा देण्याची भूमिका भाजपने समितीसमोर मांडली होती.

भाजपच्या या भूमिकेवर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत हा विषय भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे मांडण्याची मागणी केली. त्यानंतर मात्र दोन दिवस उलटूनही चर्चेची दुसरी फेरी आयोजित करण्यात आलेली नाही. त्यामुळे युतीच्या निर्णयावर संभ्रम निर्माण झाला आहे.
फोटोओळ

मीराभाईंदरमध्ये एकीकडे भाजपसोबत युुतीची चर्चा चालू असतानाच भारतीय जनता पक्षाचे मिरा भाईंदर जिल्हा उपाध्यक्ष नवीन सिंह ठाकूर यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांना प्रताप सरनाईक यांनी शिवसेनेत प्रवेश देत भाजपवर कुरघोडी करण्याचाही प्रयत्न केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *