आजपासून ठुणे यात्रौत्सवास आरंभ
शेकडो वर्षांची परंपरा
अविनाश उबाळे
ठाणे : संत गोरा कुंभार यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या शेकडो वर्षांचा वैभवशाली इतिहास लाभलेल्या व संत गोरा कुंभार यांची भक्तीपरंपरा जोपासणा-या शहापूर तालुक्यातील ठुणे येथील विठ्ठल-रखुमाई यात्रेला मंगळवारी ३० डिसेंबरला हभप कमलाकर विशे (बेडिसगाव)यांच्या मार्गदर्शनाखाली सुरवात होत आहे. यात्रेला येणाऱ्या विठ्ठलभक्तांच्या स्वागतासाठी देवस्थान ट्रस्टने जय्यत तयारी केली आहे.
ठुणे गावची विठ्ठलयात्रा ही शहापूर-मुरबाडसाठी श्रद्धा आणि उत्सवाचे प्रतिक मानली जाते.संत गोरा कुंभार यांच्या वारसांचे गाव असलेल्या ठुणे गावात गोरोबांच्या वंशजांनी विठ्ठल-रखुमाई मूर्तीची स्थापना केली होती. तेव्हापासून दरवर्षी पौष महिन्यातील पुत्रदा एकादशीच्या दिवशी भव्य ग्रामदिंडी काढून यात्रौत्सव साजरा केला जातो. पुत्रप्राप्तीसाठी येथील विठ्ठलाला साकडे घातल्यास पुत्रप्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा असल्याने नवस बोलण्यासाठी नवविवाहित भाविक दांम्पत्ये येथे येतात व पुत्रप्राप्तीनंतर बाळाला केळी व गुळामध्ये जोखण्याचा रिवाजही पाळतात. ठुण्यातील या विठ्ठल-रखुमाई यात्रेनिमीत्त मंगळवार (३०डिसेंबर) ते शुक्रवार (२ जानेवारी) असे चार दिवस महापूजा, काकड आरती, अभिषेक, हरिपाठ, भजन, किर्तन, दहिहंडी ,महाप्रसाद , पालखी,पादुका पूजन या आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमांसह कृषी प्रदर्शन,पशुसंवर्धन मार्गदर्शन,आरोग्य व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून हभप लक्ष्मण घरत (देवाची आळंदी),आनंद जोशी (अकोला), भारतीताई धसाडे(ढाकणे), नितीन हरवले (ओतूर)यांचे कीर्तन होणार आहे.
