केडीएमसी निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट एकत्र लढणार
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्ष व शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची आघाडी झाली आहे. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी रविवारी जागावाटपाची चर्चा करून आघाडीवर शिक्कामोर्तब केले आहे. निवडणुकीत संपुर्ण ताकदीने उतरणार असल्याचे दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितले.
त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी सोबत देखील बोलणी अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याबाबत निर्णय होईल अशी माहीती देण्यात आली. या आघाडीमुळे बहुजन समाजाची व मुस्लिम समाजाची मते एकत्र होऊन अनेक प्रभागातील समीकरणे बदलतील अशी माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार पातकर यांनी दिली. आघाडीच्या बैठकीस काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार पातकर, प्रदेश सचिव ब्रीजकिशोर दत्त, प्रदेश सचिव अँड. नवीन सिंग, मुन्ना तिवारी, निवडणूक प्रचार प्रमुख रत्नप्रभा म्हात्रे तसेच राष्ट्रवादी कडून खासदार सुरेश म्हात्रे, प्रदेश प्रवक्ता महेश तपासे, जिल्हाध्यक्ष डॉ. वंडार पाटील व इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत कॉग्रेसला 55 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला 40 जागा, तसेच वंचित साठी उर्वरित जागांचा विचार सुरू असल्याचे पातकर यांनी सांगितले.
