ठाणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, ठाणे शहर शाखेद्धारा अंधश्रद्धेविरोधात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी ठाण्यात दिवसभराचे ‘चमत्कार सादरीकरण प्रशिक्षण शिबीरा’चे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या शिबीरात, प्रशिक्षक प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे यांनी चमत्कारांचा वैज्ञानिक पद्धतीने पर्दाफाश केल्याची माहिती महा.अंनिसचे कार्याध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार अनिल ठाणेकर व प्रधान सचिव अशोक मोहिते यांनी दिली.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती, ठाणे शहर शाखेद्वारे दिवसभराचे ‘चमत्कार सादरीकरण प्रशिक्षण शिबीर’ नुकतेक मो. ह. विद्यालय, स्टेशन रोड, ठाणे (प.) येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे प्रशिक्षण महा.अंनिस प्रकाशन विभागाचे राज्य कार्यवाह प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे यांनी घेतले. अंधश्रद्धा, बुवाबाजी व तथाकथित चमत्कारांचा वैज्ञानिक पद्धतीने पर्दाफाश कसा करावा, याचे सखोल व प्रत्यक्ष प्रशिक्षण या शिबिरात दिले गेले.पैशाचा पाऊस कसा पडतो, घुंगरु कसा वाजतो, मंत्राने अग्नी कसे पेटविले जाते, लिंबूतुन रंग बदलणारा दोरा काढून दाखविणे, नारळ व लिंबूतुन आग पेटविणे, कमंडलूतुन विविध नद्यांचे पाणी पाझरणे, नारळातुन वस्तु काढणे, तांदूळ भरलेल्या तांब्यात त्रिशूल हवेत तरंगणे, डोळे बंद करुन रंग ओळखणे, ३ सेकंद आगीवरुन चालणे, प्रशिक्षणाच्या सहाय्याने पाण्यावर तरंगणे आदी अनेक प्रयोगाद्वारे बाबाबुवांद्वारे चमत्कार कसे केले जाते, त्यामागील युक्त्या कोणत्या असतात आणि त्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून कशा उघड करता येतात, याचे सविस्तर प्रात्यक्षिक व प्रशिक्षण या शिबिरात दिले गेले. सदर शिबिरासाठी शाळेय विद्यार्थ्यांपासून महिला व पुरुषांनी गर्दी केली होती. कोणत्याबी मांत्रिक-तांत्रिक-बुवा-बाबा यांनी चमत्कार सिद्ध केल्यास ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती’तर्फे २१ लाखाचे रोख बक्षिस दिले जाईल, असे आव्हान देऊनही आजवर गेल्या३६ वर्षात हेआव्हान कोणीही स्वीकारलेले नाही अशी माहितीही प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे यांनी यावेळी दिली.
