माथेरान शाळेचे रुपडे पालटतेय !
मुकुंद रांजाणे
माथेरान : शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या वीर हुतात्मा भाई कोतवाल नगरपरिषदेच्या शाळेचे रुपडे पालटताना दिसत असून याकामी मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅरिंग फ्रेंड्स संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने येथील वीर हुतात्मा भाई कोतवाल नगरपरिषदेच्या शाळेची डागडुजी त्याचप्रमाणे रंगरंगोटी, परिसराची स्वच्छता, विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी मैदान,उत्तम प्रकारे शौचालय व्यवस्था, परिसरातील जागेत वाचनालयाचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असून सद्यस्थितीत या शाळेचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलला आहे.मुख्याध्यापक दिलीप अहिरे, शिक्षक संतोष चाटसे यांसह अन्य शिक्षक वृंद सुध्दा यासाठी मेहनत घेत असून कॅरिंग फ्रेंड्स संस्था मुंबई यांच्या वतीने शाळेच्या छपरावर नुकताच सहा सोलर लावण्यात आले आहेत त्यामुळे विजेची बचत ह्या सोलरमुळे होण्यास मदत होऊ शकते. या अगोदर सुध्दा या कॅरिंग फ्रेंड्स संस्थेच्या माध्यमातून अनेक शालेय उपयोगी साहित्य दिलेले आहे. यासाठी उद्योजक नितीन शहा यांचे मोलाचे योगदान शाळेला मिळत आहे. प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाच्या दृष्टिकोनातून सुंदर सुंदर चित्रे काढण्यात आली असून बाके सुध्दा रंगीत केली आहेत.सध्या या शाळेची पटसंख्या १६२ इतकी आहे. इंग्रजी भाषा यायला हवी यासाठी बहुतांश पालकवर्ग मुलांना इंग्रजी शाळेत भरती करत असतात.नगरपरिषदेच्या या शाळेत उत्तम प्रकारे शिक्षण मिळत असून अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात आपल्या कलागुणांना वाव दिलेला आहे.असे असताना देखील मराठी शाळेकडे पालक लक्ष केंद्रित करीत नाहीत.शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या या शाळेचे आता पूर्णपणे रुपडे बदलले दिसत आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून ही शाळा अधिकाधिक सुंदर व्हावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत परंतु येथील पालकांनी, सुज्ञ नागरिकांनी सुध्दा आपल्या परीने खारीचा वाटा उचलून एक सामाजिक बांधिलकी म्हणून या शाळेसाठी सर्वतोपरी योगदान देणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
