राष्ट्रवादी शरद पवार गटाचा सर्व पक्षीय हक्क सरंक्षण संघर्ष समितीला पाठिंबा
27 गावांत उमेदवार न देण्याचे केले आवाहन
मात्र कोणी उमेदवार दिल्यास संपुर्ण ताकदीने उतरण्याचा जिल्हाध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांचा इशारा
कल्याण : 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी या मागणीवर सर्व पक्षीय हक्क सरंक्षण संघर्ष समिती ठाम असून कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूकीत 27 गावांमधील प्रभागात निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन संघर्ष समितीतर्फे करण्यात आले आहे. समितीच्या या आवाहनाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांनी पाठिंबा दिला असून इतर कोणत्याही पक्षाने 27 गावांमध्ये उमेदवार न देण्याचे आव्हान पाटील यांनी केले आहे. मात्र 27 गावांमधील प्रभागात कोणी उमेदवार दिल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे.
२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका व्हावी ही मागणी समितीने सरकारकडे लावून धरली होती. मात्र सरकारने मागणीचा विचार केला नाही. २७ गावातील नागरीकांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे सर्व पक्षीय राजकीय नेते पदाधिकारयांनी आणि इच्छूक उमेदवारांनी कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीवर बहिष्कार घालावा असे आवाहन सर्व पक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समितीने केले आहे. निवडणूक लढविण्याची तयारी दाखविली तर समिती त्यांच्या विरोधात समिती सक्रीय भूमिका घेणार असल्याचा इशारा समितीचे पदाधिकारी सुमित वझे यांनी दिला आहे.
समितीने हा निर्णय घेतल्याने केडीएमसीच्या १३,१६,१७,१९,३०,३१ या सहा पॅनलवर परिमाण होणार आहे. तर समितीच्या या निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पाठिंबा दिल्याने इतर राजकीय पक्ष काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
