शौर्य चक्र सन्मानित पॅरा कमांडो मधुसूदन सुर्वे ‘मी भारतीय’ने प्रभावित ;
गोल्डन क्रीडा मंडळ, बोरिवली पूर्व मध्ये झाला २३० वा दीर्घांक
मुंबई : कारगीलचे घनघोर युद्ध सुरु होते. शरीरात ११ गोळ्या असतांना अतिरेक्यांचा खातमा केलाच पण डाव्या पायात असलेल्या गोळीमुळे पायात विषबाधा होत असल्याने स्वतःच्या हाताने डावा पाय गुडघ्यापासून कापला. ३ दिवस सर्व साथीदार शहीद झाले असतांना झुंजत राहिले. यासाठी ज्यांना भारतरत्न राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम ह्यांच्या हस्ते शौर्य पदक देऊन गौरविण्यात आले, असे भारतमातेचे सुपूत्र पॅरा कमांडो मधुसूदन सुर्वे यांनी रवींद्र देवधर यांनी लिहिलेल्या, स्वतः दिग्दर्शित आणि स्वतः समवेत ऋषिकेश रानडे अभिनीत अशा ‘मी भारतीय’ या दीर्घांकाची मुक्तकंठाने प्रशंसा केली. दस्तुरखुद्द रवींद्र देवधर हे भारतमातेच्या या थोर सुपूत्राने केलेल्या या वाखाणणीने भारावून गेले. सुर्वे आणि देवधर या दोघांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. ‘मी भारतीय’ या दीर्घांकाचे सादरीकरण करुन आम्ही धन्य झालो, अशी भावना व्यक्त केली. बोरीवली पूर्व येथील राजेंद्र नगर येथे गेल्या ५९ वर्षांपासून कार्यरत असलेल्या गोल्डन क्रीडा मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त ‘मी भारतीय’ चा २३० वा प्रयोग याच मंडळाच्या प्रशस्त मैदानावर मंडळाचे सचिव श्यामराव कदम यांनी आयोजित केला होता. प्रयोग अप्रतिम झाला. या प्रयोगाला भारतमातेचे सुपुत्र पॅरा कमांडो मधुसुदन सुर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती. मधुसूदन सुर्वे यांच्या उपस्थितीने खरंच नतमस्तक आणि कृतकृत्य झालो. वाटले की अशा शुर पॅरा कमांडो समोर प्रयोग सादर केला. ह्या आणि ह्यांच्या सारख्या जवानांमुळे आपण सुखाचा श्वास घेतोय. आपण ह्यांचे आयुष्यभर ऋणी रहायला पाहिजे. पण स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार ह्या मानसिकतेत जगणाऱ्यांना ह्याची जाणीव नाही हे आपल्या राष्ट्राचे दुर्दैव आहे. पॅरा कमांडो मधुसुदन सुर्वे आणि राष्ट्राचे रक्षण करणाऱ्या सर्व जवानांना त्रिवार सलाम आणि जय हिंद, अशी भावना रवींद्र देवधर यांनी व्यक्त केली. मी भारतीय या दीर्घांकाच्या २३० व्या प्रयोगाला आमदार संजय उपाध्याय, कामगार नेते सदा चव्हाण, चेतन कदम, नयन कदम, राजा कदम, शिवभक्त श्री राजू देसाई यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
