अशोक गायकवाड
रायगड-अलिबाग : लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट व टास्कफोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने २४ व २५ डिसेंबरला क्षात्रैक्य समाज हॉल, कुरूळ, अलिबाग येथे टास्कफोर्सचे दुसरे प्रांतीय अधिवेशन उत्साहात व यशस्वीपणे पार पडले. या दोन दिवसीय अधिवेशनात रायगड जिल्ह्यातील कर्जत, अलिबाग, माणगाव, तसेच मुंबई (वरळी) व अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांमधील एकूण ३०५ टास्कफोर्स सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. पहिला दिवस : उद्घाटन व प्रेरणादायी चर्चा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात शर्मिला पाटील (गटविकास अधिकारी, अलिबाग), सुधीरकुमार गजभिये (प्रमुख, शिक्षण विभाग, लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट), उपस्थित प्रमुख पाहुणे व टास्कफोर्स रिजनल बॉडी सदस्य यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व राष्ट्रगीताने झाली. प्रास्ताविक श्रुती मालगुंडकर (व्यवस्थापक, आनंदो प्लस) यांनी केले. त्यानंतर दशरथ देशमुख (समन्वयक, आनंदो प्लस) यांनी विविध रिजनमधील टास्कफोर्स सदस्य व रिजनल बॉडीची ओळख करून दिली. पुढे टास्कफोर्स रिजनल बॉडीमार्फत मागील आठ महिन्यांच्या कामाचा आढावा सादर करण्यात आला. उद्घाटनपर भाषणात “युवा शक्ती : अंतर्मनातील उद्दिष्ट आणि नेतृत्वाचा शोध” या विषयावर शर्मिला पाटील यांनी अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन करत युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण केला. यानंतर झालेल्या चर्चा सत्रात प्रत्येक रिजनमधून दोन प्रतिनिधींनी “सशक्त, सक्षम आणि समुदाय-केंद्रित सामाजिक परिवर्तनासाठी अर्थपूर्ण युवा सहभाग” या विषयावर आपली मते मांडली. या सत्राचे सूत्रसंचालन रेश्मा पाटील यांनी केले तर समारोप सुधीरकुमार गजभिये (प्रमुख, शिक्षण विभाग, लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट) यांनी केला. सायंकाळी जेवणानंतर टास्कफोर्स सदस्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. समाजजागृतीपर गीत, नृत्य व मनोरंजनात्मक सादरीकरणाने वातावरण आनंदमय झाले. दुसरा दिवस : नेतृत्व, कृती आणि गौरव दुसऱ्या दिवशी कार्यक्रमाची सुरुवात ध्यानधारणेने झाली. टास्कफोर्स सदस्यांनी स्वागतगीत सादर केले. पहिल्या दिवसाचा आढावा कु. सह्याद्री गलांडे (टास्कफोर्स सदस्य) हिने घेतला. मुख्य मार्गदर्शन सत्रात “विचारांतून कृतीकडे : समुदाय परिवर्तनाचे शिल्पकार तरुण” या विषयावर आदरणीय अश्दिन डॉक्टर (व्यवस्थापकीय संचालक, लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट) यांनी ऑनलाईन माध्यमातून युवक आपल्या कल्पनांच्या माध्यमातून समाजात कसा सकारात्मक बदल घडवू शकतो, हे प्रभावीपणे स्पष्ट केले. यानंतर “स्थानिक समस्यांच्या निराकरणासाठी युवक नेतृत्व” या विषयावर सुधीरकुमार गजभिये (प्रमुख, शिक्षण विभाग, लाईट ऑफ लाईफ ट्रस्ट) यांनी पाहाणे – निवड करणे – कृती करणे या तीन सूत्रांच्या आधारे मार्गदर्शन केले. पुढील सत्रात “सकारात्मक समुदाय कृतीसाठी डिजिटल आणि सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर” या विषयावर सुमित सोनावळे (व्यवस्थापक, स्वीप, आनंदो) यांनी डिजिटल व सोशल मीडियाचा योग्य वापर करून सामाजिक परिवर्तन कसे साधता येईल, यावर मार्गदर्शन केले. उत्कृष्ट कार्याचा गौरव दुपारच्या सत्रात प्रेरणादायी समूहगीतानंतर टास्कफोर्समधील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सदस्यांचा व संघांचा गौरव करण्यात आला. विभागीय सर्वोत्तम टास्कफोर्स सदस्य : प्रसाद पवार, प्रणीत सकपाळ, धनंजय केंडले, माही चौधरी, सानिया थळे विभागीय सर्वोत्तम टास्कफोर्स लीडर : प्राणया पाटील, वेदिका शेळके, आकांक्षा मौले, रिदय लोभी, सानिया शेख सामाजिक प्रभाव पुरस्कार : अमित बोनकर, राजू दुरगुळे, संस्कृती मोहिते, दिव्या लोभी, अक्षय दानवे, स्नेहल कांबळे उत्कृष्ट टास्कफोर्स टीम : कर्जत विभाग या सत्राचे सूत्रसंचालन अनुजा राऊत (ऑफिसर, अलिबाग आनंदो) व दिक्षिता गोगटे (उपाध्यक्ष, रिजनल बॉडी – कर्जत) यांनी केले. अधिवेशांच्या समारोपप्रसंगी सुधीरकुमार गजभिये यांनी सर्व टास्कफोर्स सदस्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच अधिवेशनाचा समारोप “वंदे मातरम्” या राष्ट्रीय गीताने करण्यात आला. या संपूर्ण दोन दिवसीय प्रांतीय अधिवेशनाचे मुख्य सूत्रसंचालन कु. सानिका झावरे व कु. वेदांती थळे (टास्कफोर्स सदस्य, अलिबाग) यांनी केले. हे दुसरे प्रांतीय अधिवेशन सर्व विभागाच्या टास्कफोर्स रिजनल बॉडी मेम्बरने यशस्वीपणे पार पाडले.
