मिलिंद पूर्णपात्रे हा माझा बॅडमिंटन मित्र ! येत्या 31 डिसेंबर रोजी त्याचा ६६ वा वाढदिवस आहे . त्या निमित्ताने त्याला शुभेच्छा!
साधारण 1975 सालापासून माझी आणि त्याची उत्तम मैत्री आहे . आमची ओळख झाली ती जेव्हा मी चाळीसगावला बॅडमिंटन स्पर्धेनिमित्त गेलो त्यावेळेपासून! मिलिंद पूर्णपात्रे हा तिथला स्थानिक उगवता तारा आणि उत्तम बॅडमिंटन पटू होता . त्याचे आजोबा हे तर प्रसिद्ध होते ते त्यांनी पाळलेल्या सिंहिणीमुळे ! त्यांच्या बंगल्यात लीलया मुक्त संचार करणारी सिंहीण अख्ख्या महाराष्ट्राचा कुतूहलाचा विषय होता .त्यांच्या “सोनाली “ या सिंहीण हिचा दहावीला धडा होता. चाळीसगावच्या बॅडमिंटन हॉल चे नावच मुळी डॉक्टर पुर्णपात्रे बॅडमिंटन हॉल असे होते .
तर सांगायचा मुद्दा असा की ह्या छोट्या गावात दर वर्षी बॅडमिंटन स्पर्धा अत्यंत उत्साहाने पार पडायच्या आणि आम्ही ६/७ तरुण खेळाडू ठाण्याहून दर वर्षी या स्पर्धेची वारी करायचो. अशाच स्पर्धा त्या काळात महाराष्ट्रात विविध ठिकाणी होत असत . साखरवाडी , रसायनी ही माझ्या आठवणीतील अजून काही स्पर्धा स्थळे !
सांगायचं कारण की अशाच एका चाळीसगावच्या स्पर्धेत माझी मिलींद शी गाठ पडली आणि नंतर ती मैत्री कायम राहिली.आणि मला आठवतंय की त्या स्पर्धा म्हणजे एक अद्भुत अनुभव असे ! कारण एक सिंगल बॅडमिंटन कोर्ट असलं तरी पहाटे 2 वाजेपर्यंत सामने चालत असत आणि तिथले अनेक बॅडमिंटन प्रेमी ते मॅचेस बघण्यासाठी त्या हॉलमध्ये गर्दी करत असत आणि प्रत्येक सामन्यावर तिथले दर्दी आणि धनिक प्रेक्षक पैसे लावून खेळाडूंना उत्तेजन देत असत. मिलिंद ची माझी ओळख पुढे वाढत राहिली ती त्याच्या बॅडमिंटन प्रेमामुळे आणि विशेषतः त्याच्या उमद्या स्वभावामुळे आणि अनेकांशी मैत्री करून ती जोपासण्याचा त्याच्या चांगुलपणामुळे !
त्यानंतर बॅडमिंटन खेळात प्रगती करीत त्याने चाळीसगाव वरून मुंबईला प्रस्थान केले. तिथे स्वकर्तृत्वावर आणि खेळावर त्यानी इन्कम टॅक्स मध्ये खेळाडू म्हणुन नोकरी मिळवली आणि नोकरी करत असताना त्याने सुमारे पुढची 40 वर्षे हे बॅडमिंटन देखील उत्तम प्रकारे जोपासले. त्याने सुमारे 30 वर्षे आयकर विभागातर्फे RSB ,मुंबई या संघाचे राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व केले. तो कर्णधार असतांना त्यांच्या संघाने All India Central Civil Services या राष्ट्रीय स्पर्धेत एकदा राष्ट्रीय विजेतेपद तर एकदा उपविजेतेपद मिळविले.तसेच तो कोच असतांना त्यांच्या महिला संघाने तीन वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळविले होते. त्यामुळेच All India Civil Service & Cultural Board, दिल्ली यांनी त्याला “ “LIFE TIME ACHIVMENT & APPRECIATION AWARD”” देऊन त्याचा 2019 मध्ये सत्कार केला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व Certificate देऊन त्याला गौरविण्यात आले. त्याने 45+, 50+ 55+, 60+, 65+ या गटात मास्टर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सातत्याने एकेरी व दुहेरी गटात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. तसेच स्वीडन येथे झालेल्या वर्ल्ड मास्टर बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले. त्याने 45+ दुहेरी मध्ये बेनहर सोलोमन च्या साथीने तर 65+ दुहेरी मध्ये दिलीप सुखटनकर च्या साथीने राज्य विजेतेपद मिळवले आहे. दोनदा त्याने सतीश कुमार च्या साथीने मास्टर राष्ट्रीय ranking स्पर्धेत 60+ दुहेरी गटात “ रजत पदक “ मिळविले आहे. स्वतः तर तो अजूनही सातत्याने उत्तम दर्जाचं स्पर्धात्मक बॅडमिंटन खेळतच आहे तसेच त्याने प्रशिक्षणाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अनेक होतकरू आणि गुणी खेळाडूनाही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू होण्यास मार्गदर्शन केले आहे.
मिलिंदच्या कारकिर्दीतला टर्निंग पॉइंट कुठला हे जर मला कुणी विचारलं तर मला एक खास गोष्ट सांगावीशी वाटेल. १९८० साली मिलिंदच्या धुळे जळगाव महाविद्यालया संघाने त्या काळच्या बलाढ्य पुणे विद्यापीठाच्या संघाला हरवून अंतर विभागीय महाविद्यालयीन सांघिक स्पर्धा जिंकून इतिहास घडवला. ह्या विजयात मिलींदचा निर्णायक व सिंहाचा वाटा होता .त्यामुळेच त्याला पुणे विद्यापीठ संघाचे कर्णधारपद मिळाले. हा मान मिळविणारा जळगाव व धुळे जिल्हा येथील तो पाहिलाच खेळाडू होता. त्याच वर्षी नंतर त्याने विद्यापीठ संघाचा कर्णधार म्हणुन ऑल इंडिया इंटर झोन विद्यापीठ या राष्ट्रीय स्पर्धेत रौप्य पदकावर आपले नाव कोरले. त्यामुळेच त्यांच्या संघास सिलोन येथील विद्यापीठाने मैत्रीपूर्ण सामने खेळण्यासाठी आमंत्रण दिले होते. त्याच्या आयुष्यातला एक अविस्मरणीय क्षण ! आपल्या पैकी अनेकांनी पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्ली या पुस्तकातला दोन उस्ताद हा लेख वाचला असेल. या लेखात पुलंनी दोन खास व्यक्ती रेखा रेखाटल्या आहेत .एक आहे टिल्या वस्ताद आणि दुसरी आहे जोतिबा मांढरे वस्ताद . या दोघांच्या ही आयुष्यात काही परमोच्य आनंदाचे क्षण आले . आणि ते क्षण त्यांच्या आठवणीच्या कप्यात कायमचे घर करून बसले. मिलिंदच्या आयुष्यातले असेच ते क्षण आहेत . मला वाटतं विद्यापीठ स्पर्धेमध्ये मिळवलेला रोमहर्षक विजय हा मिलिंद पूर्णपात्रेच्या आयुष्यातला एक सर्वोच्च क्षण होता आणि त्याला विचारलं किंवा त्याला कधी कधी न विचारता सुद्धा त्या रोमहर्षक क्षणाची तो पुन्हा पुन्हा आठवण काढून ती सर्व हकीगत रंगतदारपणाने आपल्याला सांगतो .
मिलिंदच्या स्वभावातला चांगुलपणा असा आहे की त्यांनी अनेक मित्र जोडले. इन्कम टॅक्स मध्ये काम करत असताना बॅडमिंटन आणि ऑफीस या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यानी पूर्ण समरस होऊन काम केलं .आयुष्य सार्थकी लावलं आणि मला एक गोष्ट महत्त्वाची वाटते की चाळीसगाव सारख्या तुलनेने खेडेगाव असणाऱ्या आणि कुठलंही खेळाचे बॅकग्राऊंड नसणाऱ्या मिलिंद सारख्या खेळाडूनी मुंबईत येऊन आपलं बस्तान बसवलं , आपलं लाईफ सेट केलं ही मोठीच कृतार्थतेची बाब आहे .आणि आजही तो सातत्याने मास्टर राष्ट्रीय स्पर्धेत सातत्याने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करीत आहे. तसेच तो सुखा समाधानाने त्याच्या कुटुंबीयांसह उर्वरित आयुष्य अत्यंत आनंदाने जगतो आहे .
त्याच्या आयुष्याची फिलॉसॉफी अगदी सरळ आहे आणि साधी आहे .ती अशी आहे की लोकांना मदत करत राहावं. आयुष्यात सर्व गोष्टींमध्ये रस घ्यावा इन्व्हॉल व्हावं आणि जितकं आपल्याक डून चांगलं करता येईल तेवढे लोकांचं चांगलं करावं .
लोकांचं , खेळाडूंचं प्रबोधन करावे आणि त्यांचं भलं करावं अशी त्याची मनोमन इच्छा असते .
माझ्या या एव्हरग्रीन मित्राला त्याच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि यापुढे देखील त्याला आरोग्यमय आणि सुखी आयुष्य लाभो ही परमेश्वराकडे प्रार्थना .
-श्रीकांत वाड,
आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन प्रशिक्षक, दादोजी कोंडदेव आणि क्रिडा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त, महाराष्ट्र राज्य सरकार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *