भाजपा, शिंदेंची शिवसेना प्रत्येकी ६ जागा देणार ० रामदास आठवलेंची नाराजी दूर
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीत अखेर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांची नाराजी दुर करण्यात महायुती यशस्वी ठरले आहे. मुंबईतील महत्वाच्या १२ जागा भाजप आणि शिंदे शिवसेनेकडून आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात येणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे मुंबईचे अध्यक्ष अमीत साटम आणि प्रविण दरेकर यांना निर्देश दिलेले आहेत तर आठवले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन याबाबत अंतिम तोडगा काढला आहे.
आम्ही जागांची अंतीम मागणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली. त्यातील १२ जागा सोडण्यात येणार आहेत. अन्य जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. उर्वरित १९७ जागांवर महायुतीचा घटकपक्ष म्हणून महायुती उमेदवारांचा प्रचार करणार अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी अविनाश महातेकर, काकासाहेब खंबाळकर, गौतम सोनवणे, सिद्धार्थ कासारे, पप्पु कागदे, एम एस नंदा, हेमंत रणपिसे, सचिन मोहिते, आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.
जागा वाटपात रिपब्लिकन पक्षाला एकही जागा देण्यात आली नव्हती तसेच कोणत्याही चर्चेत रिपब्लिकन पक्षा स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे पक्षाने नाराजी व्यक्त करत ३९ जागा स्वबळावर लढण्याचे जाहिर केले होते.या नाराजीतून रिपब्लिकन पक्षाच्या ३० उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. ज्या १२ जागां रिपब्लिकन पक्षाला देण्यात आल्या आहेत तेथून भाजप आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार माघार घेतील. रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांना महायुतीचा पाठिंबा राहील. रिपब्लिकन पक्षाचे १२ उमेदवार निवडणुक लढतील असे आठवले यांनी सांगितले. परंतू ३० पैकी १२ जागा पक्षाला सोडण्यात आल्या तर उरलेल्या १८ जागावरील उमेदवार माघार घेतील का हे पहावे लागेल असेही ते म्हणाले.
यावेळी आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या विविध मागण्यांचे निवेदनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुपुर्द केले. पक्षाला २ विधानपरिषद सदस्य, ६० महामंडळाचे सदस्य, तसेच मुंबई महानगरपालिकेत २ स्वीकृत सदस्य देण्यात यावेत अशी मागणी आठवले यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
