तिकिट नाकारलेल्या वंदना काबरा यांच्या समर्थनार्थ राजस्थानी व्यापाऱ्यांनी युती विरोधात दंड थोपटले

अनिल ठाणेकर

ठाणे : ठाणे महापालिका निवडणुकीत भाजप – शिवसेना शिंदे गटाची युती झाल्यानंतर भाजपमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असणाऱ्यांची नाराजी उफाळुन आली आहे.वसंतविहार परिसरातील प्रभाग क्रमांक ४ मधुन इच्छुक असलेल्या वंदना सुनिल काबरा ह्यांना भाजपने तिकीट नाकारल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. निवडणुकीत राजस्थानी समाजाला प्रतिनिधित्व नाकारल्याच्या निषेधार्थ गुरुवारी राजस्थानी समाजातील तमाम संघटना तसेच व्यापारी मंडळांनी एकत्रित येत आता युतीच्या विरोधात दंड थोपटले आहेत.त्यामुळे राजस्थानी समाजाचे हे नाराजी नाट्य निवडणुकीत भाजपला चांगलेच महागात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत ठाण्यातील १३१ जागा लढवण्याची तयारी केलेल्या भाजपची अखेरच्या क्षणी शिवसेना शिंदे गटाशी युती झाली आहे.शिंदे गटासोबत युती नको अशी भूमिका भाजपच्या पदाधिकार्‍यांनी घेतली होती, मात्र युती झाल्यामुळे भाजपच्या पदाधिकार्‍यांची खदखद बाहेर पडू लागली आहे. युतीमध्ये भाजपच्या वाट्याला ४० जागा आल्या असुनही यापैकी एकही जागा राजस्थानी समाजाच्या वाटयाला आलेली नाही. ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चार येथील वसंतविहार, टीकुजिनीवाडी भागात सुनील काबरा हे प्रथितयश उद्योजक वास्तव्यास आहेत. या प्रभागामधुन त्यांच्या पत्नी वंदना काबरा ह्या इच्छुक असतानाही उमेदवारी कापली गेल्याने त्या आता अपक्ष म्हणून निवडणूक लढवित आहेत. उमेदवारी नाकारल्याने या संदर्भात सुनील काबरा यांनी आपली भूमिका मांडली. सुनिल काबरा व त्यांच्या पत्नी वंदना काबरा यांनी ठाणे शहरात मोठे समाजकार्य केलेले आहे. कोविड काळात तर ह्या दांपत्याने अनेक गरीब तसेच गरजुंना मोफत अन्नवाटप तसेच लसीकरण मोहिम राबवली होती. याशिवाय, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मेक इन इंडिया’ पासुन विविध शासकिय योजनांचा प्रसार तसेच योजना गोरगरीबांपर्यंत पोहचवल्या. तरीही पक्षाने याची दखल न घेता तिकिट वाटपात अन्याय केल्याची भावना व्यक्त करून बंडाचा झेंडा फडकविला आहे. काबरा यांनी आता अपक्ष उमेदवार म्हणुन अर्ज दाखल केला आहे. यावेळी राजस्थानी समाजाच्या सर्व संघटनांचे प्रतिनिधी, व्यापारी मंडल आणि राजस्थानी समुदायाची मंडळी आणि शेकडोंच्या संख्येने राजस्थानी नागरीक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *