मराठी अभ्यास केंद्राच्या मराठीनामा व मराठीकारण चळवळीला धर्मराज्य पक्षाचा जाहीर पाठिंबा – राजन राजे
अनिल ठाणेकर
ठाणे : ‘मराठी अभ्यास केंद्रा’ने, मराठी भाषेचे संवर्धन आणि मराठी समाजाच्या हितासाठी सातत्याने जो लढा दिला आहे, तो राजकीय दृष्टीकोनातून अधिक तीव्र करणे गरजेचे आहे. त्याकामी, ‘धर्मराज्य पक्ष’ पूर्ण ताकदीनिशी आपल्या पाठीशी राहील, असे आश्वासन मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख डाॅ. दीपक पवार यांना धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांनी दिले आहे.
धर्मराज्य पक्षाचा जन्मच मुळात मराठी-श्रमिकवर्गाला, भांडवली-व्यवस्थेतील ‘कंत्राटी-कामगार पद्धती’च्या क्रूर, पोलादी टाचेखाली त्याने गमावलेले त्याचे ‘माणूसपणाचे न्याय्य-हक्क’ मिळवून देण्यासाठी झाला आहे.महाराष्ट्रात निर्माण झालेली संपत्तीच, महाराष्ट्रातल्या मराठी-माणसाच्या मुळावर येऊन, त्याला त्याच्या हक्काच्या महाराष्ट्रात ‘दुय्यम-नागरिकत्वा’चा शाप भोगावा लागतोय. म्हणून, आम्ही तुमच्यासारखेच रात्रंदिवस तळमळत असतो.” मातृभाषेची आणि ती भाषा बोलणार्या माणसांची, भांडवली-बाजारपेठेतील किंमत घटत गेली की, ती भांडवली-व्यवस्थेतल्या आधुनिक ‘गुलामां’ची म्हणूनच केवळ अस्तित्वात उरलेली भाषा; हळूहळू, पण निश्चितपणे नष्टप्राय व्हायला लागते (त्याची पहिली अवस्था म्हणजे, भाषा वेडीवाकड्या धेडगुजरी स्वरुपात बोलली जायला लागते…जे आपण मराठी-भाषेच्या संदर्भात अलिकडे अनुभवत आहोतच), हा इतिहासाचा धडा आपल्याला विसरुन चालणार नाहीच! तेव्हा, आगामी महापालिकांच्या निवडणुकांच्या निमित्ताने आपण तयार केलेला ‘मराठीनामा’ हा केवळ एक निवडणुकीपुरता ‘जाहीरनामा’ न राहता, तो मराठी माणसाच्या अस्मितेचा आणि सर्वांगीण प्रगतीचा महामार्ग व्हावा, असे आमचे ठाम मत आहे. आजच्या काळात धर्माच्या नावावर होणाऱ्या ध्रुवीकरणाला छेद देण्यासाठी आपण मांडलेली ‘महाराष्ट्र धर्माची’ संकल्पना अत्यंत महत्त्वाची आहे. मानवी-समुहांची परस्परावलंबी, एकजिनसी, साहचर्ययुक्त ‘जैविक-बांधणी’ करण्यात ‘भाषा’ हा घटक, ‘राष्ट्र’ या संकल्पनेपेक्षाही कितीतरी अधिक महत्त्वाचा ठरताना, इतिहासाच्या पानोपानी आपल्याला दिसतंच. थोडं पुढे जात, ‘धर्मराज्य पक्षा’च्या स्थापनेपासूनच “संयुक्त-महाराष्ट्रानंतर आता, ‘स्वायत्त-महाराष्ट्र’, राष्ट्रांतर्गत राष्ट्र, ‘स्वायत्त-महाराष्ट्र’, ‘शिवछत्रपती-राष्ट्र’ (‘महाराष्ट्रा’चं नाव बदलून ‘शिवछत्रपतीराष्ट्र’ व्हावं, ही आमची प्रारंभापासूनच आग्रही ‘राजकीय-भूमिका’आहे)”, ही आम्ही आजवर मांडलेली संकल्पनाही, आपल्या ‘मराठी अभ्यास केंद्रा’ने अंगिकारावी, ही अंतिम मराठी-हितासाठी आपल्याला नम्र विनंती”मराठीत्व, हेच ‘राष्ट्रीयत्व”, या भूमिकेतून “स्वायत्त-महाराष्ट्रा”च्या मागणीला सतत उजाळा मिळत रहावा व मराठी-जनमानसात त्याची सातत्याने रुजवात व्हावी, म्हणून आपल्यापैकी प्रत्येक मराठी-माणसाने प्रत्येक भाषणाअंति, “जय महाराष्ट्र, जय हिंद” असा (‘भारतीय-राष्ट्रीयत्वा’च्याही आधी अग्रक्रमाने), ‘मराठी-राष्ट्रीयत्वा’चा पुकारा व्हावा, त्याला आपल्याकरवी अधिकचा पुढावा मिळावा, ही देखील, आमची आपल्याला नम्र विनंती व तशी शिवछत्रपतीचरणी प्रार्थना राहील. भाषावार प्रांतरचनेत भाषेला आणि प्रादेशिक संस्कृतिला प्रत्येक निवडणुकीच्या केंद्रस्थानी आणून संपूर्ण महाराष्ट्रावरील, विशेषतः मुंबई-ठाण्यासारख्या शहरांवरील (मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नाशिक-नागपूर ज्याला, आम्ही “मुं.ठा.पु.रा.ना.” असं संबोधतो) परप्रांतीय-आक्रमण रोखणं, हे केवळ आपल्या सर्वांसाठी क्रमप्राप्तच आहे, असं नव्हे; तर, ते आपलं सर्वांचंच आद्यकर्तव्य (आमच्यादृष्टीने ‘धर्मकर्तव्य’) आहे. ‘मुंठापुराना’ शहरं व त्यांच्या उपनगरांतील ‘मराठी-टक्का’ आणि ‘मराठी-मत्ता’ झपाट्याने कमी होत चालली आहे. महत्त्वाची शहरे जैन, गुजराती, मारवाडी, सिंधी, पंजाबी आणि आता हिंदी-भाषिक गिळंकृत करत चालले आहेत. चारही बाजूंनी मराठी माणसाची ‘कोंडी’ केली जात आहे. “कालपरवापर्यंत महाराष्ट्राची ‘महालक्ष्मी’ आणि आता तर, अवसानघातकी व दळभद्री मराठी-राजकारण्यांमुळे व नादान मराठी-मतदारांमुळे महाराष्ट्राची ‘राजलक्ष्मी’ही ‘गुज्जू-भाषिकां’च्या ताब्यात जात चालली असताना; आपण स्वस्थ बसूच शकत नाही. अशा अवघड स्थितीत, समस्त मराठी जनांना एकत्र करुन सर्वच पातळींवर एकाच वेळेस निर्धाराने व चिकाटीने सनदशीर लढा उभारल्याशिवाय गत्यंतर नाही. आपण ‘मराठी अभ्यास केंद्रा’तर्फे निरलसपणे व निर्धाराने अत्यंत कष्टपूर्वक ते काम निरंतर करत आहात याचं आम्हाला खूपच अप्रूप आहे! म्हणूनच, २ जानेवारी – २०२६ रोजी ‘मुंबई मराठी पत्रकार संघा’त होणाऱ्या पत्रकार-परिषदेत आपल्यातर्फे मांडल्या जाणाऱ्या, या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. हा विचार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा आणि मराठी भाषा आणि मराठी माणसाचे हित कसोशीने त्याद्वारे जपले जावे, यासाठी ‘धर्मराज्य पक्ष’ आपल्यासोबत आहे, अशा सदिच्छा राजन राजे यांनी डाॅ दीपक पवार यांना दिल्या आहेत.
