‘इंडिगो’च्या अलीकडील संकटानंतर, सरकारने तीन एअरलाइन्सना ऑपरेटिंग परवाने दिले आहेत. यापैकी एका एअरलाइन्सची ऑपरेशनल तारीख जाहीर करण्यात आली आहे. ‘शंख एअरलाइन्स’ जानेवारीच्या पहिल्या सहामाहीमध्ये तीन एअरबस विमानांच्या सुरुवातीच्या ताफ्यासह ऑपरेशन सुरू करण्याची अपेक्षा आहे. कंपनी लखनऊला दिल्ली, मुंबई आणि इतर महानगरांशी जोडण्यावर लक्ष केंद्रित करेल. ही माहिती कंपनीचे अध्यक्ष श्रावणकुमार विश्वकर्मा यांनी दिली.
त्यांनी सांगितले, की ‘शंख एअरलाईन्स’ पहिल्या टप्प्यात उत्तर प्रदेशातील विविध ठिकाणी उड्डाणे चालवेल. पुढील महिन्यात ताफ्यात आणखी दोन विमाने जोडली जाण्याची अपेक्षा आहे. सध्या विमानांच्या ताफ्याचा आकार मर्यादित आहे; परंतु विस्तारासह ते संपूर्ण देश व्यापेल. 2028 किंवा 2029 पर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याची योजना आहे. ‘शंख एअरलाईन्स’चे मुख्य उद्दिष्ट मध्यमवर्गीय प्रवाशांना आणि पहिल्यांदाच प्रवास करणाऱ्यांना हवाई प्रवास सुलभ करणे आणि हवाई प्रवास ही लक्झरी आहे ही धारणा मोडून काढणे आहे.
बस किंवा टेम्पोप्रमाणे विमान हे केवळ वाहतुकीचे साधन आहे आणि त्याकडे काही खास म्हणून पाहिले जाऊ नये, असे विश्वकर्मा म्हणाले. त्यांनी सांगितले, ‘ही विमान कंपनी सुरू करण्यामागील कल्पना चार वर्षांपूर्वी आली होती. त्यानंतर मला एनओसी कशी मिळवायची, नियम काय आहेत आणि ही व्यवस्था कशी काम करते यासारख्या प्रक्रिया समजण्यास सुरुवात झाली. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले विश्वकर्मा म्हणाले, की मी ओळखीच्या लोकांसोबत ऑटो चालवली आणि काही छोटे व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी बहुतेक व्यवसायांमध्ये मी अयशस्वी झालो. 2014 मध्ये सिमेंट व्यवसायात प्रवेश करून माझा व्यवसाय प्रवास सुरू राहिला. त्यानंतर मी टीएमटी स्टील, खाणकाम आणि वाहतुकीत प्रवेश केला. आज आमच्याकडे 400 हून अधिक ट्रकचा ताफा आहे. ही वाढ हळूहळू आणि नैसर्गिकरित्या झाली. कोणतीही भव्य योजना नव्हती. कालांतराने गोष्टी पुढे गेल्या.
विमान वाहतूक क्षेत्राचे सर्वात वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांपैकी एक म्हणून वर्णन करताना विश्वकर्मा म्हणाले, की या क्षेत्राची सर्वात मोठी ताकद म्हणजे मजबूत रोख प्रवाह. ते म्हणाले, की आमच्या व्यापारी फर्मचे नाव आधीच ‘शंख’ होते आणि या नावाला सांस्कृतिक अर्थ आहे. म्हणूनच आम्ही एअरलाइनचे नाव शंख ठेवले. विमान कंपनीला तिच्या मूळ कंपनीकडून पूर्ण पाठिंबा आहे. विमाने भाड्याने घेतली जातात आणि बाहेरील कंपन्यांकडून वित्तपुरवठा केला जातो. शिवाय आम्ही उत्सवकाळात तिकिटांच्या किमती वाढवल्या जाणार नाहीत, तर ‘बिझनेस क्लास’चे भाडे स्पर्धकांपेक्षा जास्त असेल. कंपनी तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करेल.
