शिवसेना विभाग प्रमुख अनंता पगार यांचा राजीनामा
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना भाजपाची युती झाल्याने दोन्ही पक्षातील अनेक इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे. कित्येक जणांना उमेदवारी अर्ज दाखल न करता आल्याने व्यथित असून याचाच परिणाम म्हणून अनेकांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे तर अनेकांनी दुसऱ्या पक्षातून अथवा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अशातच कल्याण पश्चिम मधील विभाग प्रमुख अनंता पगार हे देखील इच्छुक होते मात्र पक्षाने उमेदवारी न दिल्याने अखेर नाराज पगार यांनी आपल्या विभाग प्रमुख पदाचा राजीनामा शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला आहे.
अनंता पगार हे सन २००५ पासून गेली २० वर्षे शिवसेना पक्षात सक्रिय आहेत. पक्ष संघटना वाढीसाठी तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी पगार हे नेहमी कार्यरत होते. परंतु सद्यस्थितीत पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाकडून अनंता पगार व त्यांच्या प्रभागातील कार्यकर्त्याची गळचेपी केली जात आहे. दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. शहरातील स्थानिक नेतृत्वाच्या मनमानी कारभाराला व होत असलेल्या अन्यायाला कंटाळून पगार यांनी पक्ष सदस्यत्व तसेच विभाग प्रमुख पदाचा राजीनामा दिला असल्याचे सांगितले.
