सत्ता आली तरी विकासासोबत पर्यावरण संवर्धन गरजेचे – पुष्पा रत्नपारखी
कल्याण : महाराष्ट्रात सध्या सर्वत्र निवडणुकांची धामधूम सुरू असून १६ तारखेला निकाल जाहीर होणार आहे. निकालानंतर सत्तास्थापना होईल आणि विकासकामांना वेग येईल. मात्र विकासासोबतच पर्यावरण जपणे ही आजची अत्यंत महत्त्वाची व काळाची गरज असल्याचे मत सामाजिक कार्यकर्त्या व जागतिक पर्यावरण संस्थेच्या विभाग प्रमुख, वालधुनी नदी स्वच्छता संघर्ष समितीच्या अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी कल्याण शहर उपाध्यक्ष, पुष्पा रत्नपारखी यांनी व्यक्त केले आहे.
त्या म्हणाल्या की, प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या प्रभागातून किंवा मतदारसंघातून वाहणाऱ्या नद्यांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. अनेक ठिकाणी नद्या प्रदूषित झालेल्या असून त्यांचा परिणाम थेट नागरिकांच्या आरोग्यावर व भूजल पातळीवर होत आहे. त्यामुळे नदी स्वच्छता अभियान राबवणे हे केवळ जबाबदारी नव्हे तर आवश्यक कर्तव्य आहे. तसेच ज्या भागात झाडे, वनक्षेत्र किंवा हरित पट्टा आहे, त्या ठिकाणी वृक्षसंवर्धन व वृक्षारोपणाला प्राधान्य दिले पाहिजे. झाडांची उपासना व जपणूक केली तरच पर्यावरणाचा समतोल राखता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
सत्ता येते आणि जाते, पण निसर्ग जपला गेला तरच पुढील पिढीसाठी सुरक्षित भविष्य निर्माण होईल. त्यामुळे आगामी काळात विकासकामांबरोबरच पर्यावरण संवर्धन हे प्रत्येक लोकप्रतिनिधीच्या अजेंड्यावर असले पाहिजे, असे आवाहन पुष्पा रत्नपारखी यांनी केले आहे.
