क्रीडांगण अनुदान घोटाळ्याची चौकशी सुरू.
आण्णा साळवे यांच्या तक्रारीची दखल.
जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश
राजीव चंदने
मुरबाड : सन २०२२–२३ मधील क्रीडांगण विकास अनुदान योजनेतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी प्रशासन अखेर हालचालीत आले असून, चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सामाजिक कार्यकर्ते आण्णा साळवे, जिल्हाध्यक्ष अन्याय अत्याचार निर्मूलन समिती, ठाणे यांनी केलेल्या लेखी तक्रारीची दखल घेत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, शहापूर यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी, ठाणे यांना चौकशीचे निर्देश दिले आहेत.
मोरोशी, खुटल (बारागाव), सासणे (काचकोली), टाकीपठार, पेंधरघोळ-शेणवे व शिरोळ या सह अनेक आदिवासी आश्रमशाळांमध्ये एकही प्रत्यक्ष काम न करता बनावट बिलांवर निधी उचलल्याचा आरोप करण्यात आला होता. या संदर्भात १५ दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते, मात्र अद्याप अहवाल प्राप्त न झाल्याने तो तात्काळ सादर करण्याचे पुनः निर्देश देण्यात आले आहेत.
आण्णा साळवे यांच्या तक्रारीमुळे शासन पातळीवर चौकशीचे चक्र फिरू लागले असून, दोषींवर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अपहार करणाऱ्यांचे धाबे दणाणलेच पाहिजेत, अशी जोरदार मागणी आता पुन्हा ऐरणीवर आली आहे. याप्रकरणी जर कारवाई झाली नाही तर अन्याय अत्याचार समितीचे जिल्हाध्यक्ष, साळवे हे सव्वीस जानेवारी रोजी उपोषण करणार असून तत्पूर्वी कारवाई करावी अशी त्यांनी मागणी केली आहे.
