भाजपाच्या माजी नगरसेवकासाठी अधिकृत उमेदवाराने स्वतःहून सोडली उमेदवारी
उमेदवारीबाबत कल्याणात भाजपचा आदर्श वस्तुपाठ
कल्याण पश्चिमेच्या पॅनल क्रमांक 7 मधील उदाहरणाचे होतेय कौतुक
कल्याण : एकीकडे स्वतःलाच उमेदवारी मिळावी म्हणून पक्षाला आणि पक्षनेतृत्वाला वेठीस धरण्याचे अनेक प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये घडले आहेत. असे असले तरी कल्याणच्या भाजपमध्ये मात्र पक्षाच्या माजी नगरसेवकासाठी अधिकृत उमेदवाराने स्वतःहून आपल्या उमेदवारी सोडल्याचे आदर्श उदाहरण समोर आले आहे. कल्याण पश्चिमेतील पॅनल क्रमांक 7 मध्ये घडलेल्या या प्रकाराचे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक केले जात आहे. भाजपाचे माजी नगरसेवक संदीप गायकर यांनी स्वतःला मिळालेली उमेदवारी युवा कार्यकर्ता शामल गायकर याच्यासाठी सोडली होती. संदीप गायकर यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने कल्याण पश्चिमेतील पॅनल क्रमांक 7 मध्ये भाजपकडून शामल गायकर यांच्यासह हेमलता नरेंद्र पवार आणि डॉ. पंकज उपाध्याय यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली होती.
मात्र ज्या व्यक्तीमुळे आपण आज भाजपात आहोत, ज्या व्यक्तीने आपल्याला पक्षाचे पहिले पद दिले, तीच व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात नसल्याची खंत डॉ. पंकज उपाध्याय यांना वाटत होती. त्यामुळे डॉ. पंकज उपाध्याय यांनी संदीप गायकर यांची भेट घेत या पक्षाने दिलेल्या उमेदवारीवर तुमचाच अधिकार असल्याचे सांगितले. अखेर डॉ. उपाध्याय यांनी गायकर यांची समजूत काढली आणि भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनाही आपल्याऐवजी संदीप गायकर यांना उमेदवारी देण्याची विनंती केली.
डॉ. पंकज उपाध्याय यांनी केलेली विनंती आणि दाखवलेले मनाचे औदार्य पाहता पक्षानेही मग संदीप गायकर यांना अधिकृत उमेदवारीसाठी एबी फॉर्म दिला. परंतु तांत्रिक कारणामुळे तो ग्राह्य धरला न गेल्याने संदीप गायकर हे आता भाजप पुरस्कृत म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तसेच भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनीही याबाबत पत्र काढून संदीप गायकर हे भाजपचे पुरस्कृत उमेदवार असल्याचे नमूद केले.
