वैशाली सामंत यांच्या लगीन गीताचा लोकार्पण सोहळा मुंबईत होणार

लग्नगीताचा लोकार्पण सोहळा मुंबईत रंगणार

‘माझं लगीन ठरलं’ या गीताचा आनंद प्रेक्षकांना घेता येणार

मुंबई : लग्नसराईत मराठी घराघरात घुमणाऱ्या नव्या आणि अनोख्या लग्नगीताचा खास लोकार्पण सोहळा लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहे. मिती ग्रुप प्रस्तुत ‘माझं लगीन ठरलं’ या विशेष गीतप्रकल्पाचा भव्य लोकार्पण सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला असून, संगीतप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. लग्नाच्या आनंदी क्षणांना, नात्यांमधील हळवे भाव, गंमत, उत्साह आणि पारंपरिक संस्कृती यांचे सुंदर मिश्रण असलेले हे गाणे येत्या लग्नसराईत विशेष लोकप्रिय ठरेल. या गीतांमधून आजच्या काळातील लग्नसोहळ्याचा आधुनिक बाज जपतानाच मराठी संस्कृतीचा गोडवा टिकवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या गीतप्रकल्पात प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांचा प्रमुख सहभाग असून, त्यांच्या सुमधुर आवाजामुळे या गीताला खास रंगत आली आहे. गीताची संकल्पना आणि गीतलेखन सुप्रसिद्ध कवी विनय शिर्के यांनी केले आहे. गीताला संगीतकार प्रणव हरिदास यांनी आधुनिक आणि श्रवणीय संगीताची जोड दिली आहे, दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवरसेन येंसांबरे यांनी समर्थपणे सांभाळली आहे. हे गाणं  वैशाली सामंत, अभिनेते आयुष साळुंके आणि अभिनेत्री निष्ठा केसरवाणी यांच्यावर चित्रित झाले आहे. लग्न घरातली सगळी लगबग, नातेवाईक, मित्रमंडळी यामुळे आपल्याच घरात हे जणू घडते आहे असे वाटते. या संपूर्ण प्रकल्पाची निर्मिती मिती ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका उत्तरा मोने यांनी केली आहे. या गीताचा लोकार्पण सोहळा गुरुवार ८ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर, मिनी थिएटर, प्रभादेवी येथे होणार आहे. या कार्यक्रमात  सामंत यांच्याशी तसंच गीतकार, संगीतकार सर्व कलाकार यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची तसेच सामंत यांच्या आवाजात हे गाणे ऐकण्याची खास संधी रसिकांना मिळणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. संगीत, लग्नसराईचा उत्साह आणि कलाकारांचा स्नेहपूर्ण संवाद अनुभवण्यासाठी या लोकार्पण सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *