८१ अधिकृत उमेदवारांच्या साक्षीने भगवा फडकवण्याचा शिवसेनेचा निर्धार

मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतर्फे मीरा रोड येथील शिवार गार्डन येथे भव्य महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात उपस्थित राहिलेल्या ८१ अधिकृत उमेदवारांसह हजारो महिला कार्यकर्त्यांनी मिरा-भाईंदर महापालिकेवर भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला. महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती पाहता शहरात राजकीय परिवर्तनाचे संकेत स्पष्ट होत असल्याचे चित्र या मेळाव्यात उमटले.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रसंगी महिलांना आवाहन करताना सांगितले की, “गेल्या दहा वर्षांत सत्तेच्या मोहात अंध झालेल्या आणि विकासाच्या कामांना अडथळा आणणाऱ्या प्रवृत्तींनी शहराचे मोठे नुकसान केले आहे. आता या ‘भस्मासुरी सत्तेचा’ अंत निश्चित असून त्यासाठी महिलांची एकजूट हेच मोठे बळ आहे.” महिलांनी मतदानाच्या माध्यमातून परिवर्तन घडवून आणण्याचे आवाहनही त्यांनी केले.

महिला सक्षमीकरणावर बोलताना सरनाईक म्हणाले की, बचत गटांतील महिलांना केवळ आश्वासन नव्हे तर आर्थिक स्थैर्य देणारी ठोस व्यवस्था उभी करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी बचत गटांसाठी स्वतंत्र ‘उमेद मॉल’ उभारण्याची मोठी घोषणा त्यांनी केली. या मॉलचे भूमिपूजन २०२६ मध्येच करण्याचा शब्द त्यांनी यावेळी दिला. या निर्णयामुळे महिलांना स्वावलंबनाचा नवा मार्ग उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मेळाव्यात उपस्थित महिलांनी शिवसेनेच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आगामी निवडणुकांत सक्रियपणे काम करण्याचा संकल्प केला. शहरातील विविध प्रभागांतील महिला बचत गट, स्वयं-सहाय्यता गट आणि तरुणींची मोठ्या संख्येने उपस्थिती मेळाव्याचे वैशिष्ट्य ठरली. त्यामुळे हा मेळावा केवळ प्रचारनिहाय नसून महिलांच्या स्वाभिमानाचा आणि सत्तांतराच्या तयारीचा हुंकार असल्याचे निरीक्षण राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

या कार्यक्रमाला शिवसेनेच्या स्टार प्रचारक आणि राष्ट्रीय प्रवक्त्या शायना एन.सी. तसेच प्रवक्त्या सुझी बेन शाह यांची प्रमुख उपस्थिती होती. “मिरा-भाईंदरमधील स्त्रीशक्ती परिवर्तनासाठी सज्ज झाली आहे. शहराचा विकास आणि महिलांचे सशक्तीकरण यासाठी भगवा झेंडा निर्णायक ठरणार आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या शेवटी ८१ अधिकृत उमेदवारांनी प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत एकत्र येऊन विजयाची शपथ घेतली. मोठ्या प्रमाणातील उपस्थिती, उत्साह आणि घोषणाबाजीमुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिल्याचे स्पष्ट झाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *