बावनकुळेंची अजित पवारांना धमकी !
७० हजार कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून लागलेला नाही
पुणे: पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणूकीत भाजपा हा सर्वाधिक भ्रष्टाचारी पक्ष असल्याची टिका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवारांना आज भाजपचे नेते आणि महसूल मंत्री बावनकुळेंनी जाहिर धमकीच दिली आहे. अजित पवारजी ७० हजार कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून लागलेला नाही. असे सुचक वक्तव्या त्यांनी केले आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये घेतलेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्यावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप झाले, हे तुम्हाला माहिती असेल. पण ज्यांनी माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सगळ्यांसोबत मी आज सरकारमध्ये बसलो आहे ना, असा युक्तिवाद करत अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना कोंडीत पकडले आहे. त्यावर त्यांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी देखील प्रत्युत्तर दिलं त्यानंतर आता याप्रकरणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोजक्या शब्दातच अजित पवारांना डिवचलं आहे.
आम्ही मागची पानं चाळली तर अजित दादांना बोलता येणार नाही, असा थेट इशारा बावनकुळेंनी अजित पवारांना दिला आहे. तर ७० हजार कोटींच्या सुनावणीचा निकाल अजून लागलेला नाही, असंही ते म्हणालेत. अजित पवारांच्या वक्तव्यावर बावनकुळे म्हणाले, ठीक आहे, हे काही अभिमानास्पद नाही. न्यायालयात सुनावणी सुरु आहे, त्याचा काय निकाल येईल, त्यावर आपण पुढं जाऊ. शेवटी केस विचाराधीन आहे, अजून निकाल लागलेला नाही. अजित दादा प्रगल्भ नेते आहेत. एवढ्या छोट्या निवडणुकीसाठी या बाबी बाहेर काढणे आणि एका महापालिकेसाठी महायुतीत मनभेद निर्माण करु नयेत. हे योग्य नाही. अजित दादा याचा विचार करतील. बोलता खूप येईल, मात्र ही ती वेळ नाही, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
आम्ही मागची पानं पलटली तर…. अजित दादांना सल्ला देण्याइतका मी मोठा नाही. महायुतीत मनभेद आणि मतभेद निर्माण होईल असं बोलायचं नाही. असं महायुती समन्वय बैठकीत ठरलं होतं. तरी ते असं का वागले, असं का बोलले, याची मला कल्पना नाही. पण त्यांनी असं बोलायला नको होतं. ते राज्यातील महत्वाचे नेते आहेत. त्यामुळं अजित दादांनी समन्वय समितीत ठरल्याप्रमाणे वागावे, असा थेट इशारा त्यांनी अजित पवारांना दिला आहे.
