संतोष धुरींचा मनसेला ‘रामराम’; फडणवीसांच्या साक्षीने भाजपात
राज ठाकरे उदधवाजींना पूर्णपणे सरेंडर झालेत, ० उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय
स्वाती घोसाळकर
मुंबई : राज ठाकरे यांनी आमचा मनसे पक्ष उध्दव ठाकरेंच्या शिवसेनेला पूर्णपणे सरेंडर केला आहे, उद्धव ठाकरेंनी मनसेचा ताबा घेतलाय म्हणून मी मनसे सोडत आहे असे जाहीर करीत मनसेचे माजी नगरसेवक आणि राजचे निष्ठावंत संतोष धुरी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या साक्षीने भाजपात प्रवेश केला.
संतोष धुरी यांच्या या पक्ष प्रवेशासाठी नितेश राणे आणि किरण शेलार यांनी प्रयत्न केले. त्यांना सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घडवून आणली. आणि त्यानंतरच आज दुपारी भाजपा मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साठम यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला.
संतोष धुरी यांनी भाजपमध्ये प्रवेश करताच पहिल्याच पत्रकार परिषदेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात टीकेची तोफ डागली. मुंबईत मनसेला ५२ जागा सोडल्याचे दिस आहेत. मात्र, त्यापैकी सात किंवा आठ जागा निवडून येईल की नाही, याचीही शाश्वती नाही. उद्धव ठाकरे गटाने आम्हाला पाहिजे त्या सीट दिल्या नाहीत. उलट ज्या जागांवर ठाकरे गटाकडे उमेदवारच नव्हते किंवा ज्याठिकाणी त्यांच्या विद्यमान नगरसेवकाचे नाव खराब झाले होते, अशा जागा ठाकरे गटाने मनसेला देऊ केल्या. माहीम, दादर, वरळी, शिवडी, भांडूप या मराठा माणसांचा टक्का जास्त असलेल्या भागांमध्ये मनसेची फक्त एका जागेवर बोळवण करण्यात आली. ठाकरे गटाने त्यांना ज्या सीट सोडायच्या होत्या, त्याच मनसेला दिल्या, असा घणाघाती टिका संतोष धुरी यांनी यावेळी केली.
ठाकरे गट आणि मनसेत मुंबईत जागावाटप सुरु असताना प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मनसेला दोन जागा सोडायच्या असे ठरले होते. पण दादरमधील वॉर्ड क्रमांक १९० आणि वॉर्ड क्रमांक १९२ आपल्याला मिळणार नाहीत, असे नितीन सरदेसाईंनी मला सांगितले. मी तेव्हाच काय करायचं ते करा पण मला मोकळं करा, असे नितीन सरदेसाई यांना सांगितले. मात्र, वॉर्ड क्रमांक १९२ ठाकरे गटाच्या वाट्याला गेला. तो वॉर्डही प्रकाश पाटणकर यांच्याकडून काढून घेण्यात आला. मला आणि संदीप देशपांडेला जागावाटपाच्या चर्चेत घेतलं नाही किंवा उमेदवारी दिली नाही, याचा राग मला नाही. राज साहेबांनी आम्हाला आधीच भरपूर दिले आहे. पण आमचे नेते संदीप देशपांडे साहेबांना जागावाटपाच्या चर्चेत कुठेही घेतले नाही. ज्यावेळी आम्ही याविषयी विचारणा केली, तेव्हा आम्हाला कळाले की, वरुन असा तह झाला आहे की, राज साहेबांनी संतोष धुरी आणि संदीप देशपांडे हे दोन किल्ले सरेंडर केले आहेत. हे दोघे उमेदवार म्हणून किंवा जागावाटपात कुठेही दिसणार नाहीत, असा आदेश वांद्र्याच्या बंगल्यावरुन आला होता, असे संतोष धुरी यांनी म्हटले.
photot caption
मनसेला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश करण्यापुर्वी संतोष धुरी यांनी नितेश राणे आणि किरण शेलार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.
