हवा प्रदूषित करणाऱ्या ५५७ व्यावसायिकांना नोटीस
मुंबई : हवा प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने या हवा प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या ५५७ बांधकामांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तसेच २३३ ठिकाणी ‘काम थांबवण्याची नोटीस’ देण्यात आली.
हिवाळ्यात हवेच्या कमी तापमानामुळे व वेगवान वा-याच्या अभावाने जमिनीलगतची प्रदूषके ही उंचीवरील हवेत मिसळण्याचे प्रमाण कमी होते. मुंबईच्या नैसर्गिक हवामानाच्या स्थितीनुसार दरवर्षी ऑक्टोबर ते फेब्रुवारी या कालावधीत प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ होत असते. मुंबईतील वायू प्रदूषण वाढण्यास विविध कारणे कारणीभूत आहेत. यामध्ये औद्योगिक उत्सर्जन, बांधकामांच्या ठिकाणी निर्माण होणारी धूळ, रस्त्यांवरील धुळीचे पुर्नप्रक्षेपण, कारखान्यातील उत्सर्जन, कचरा जाळणे, कारखाने व वाहनातून निघणारा धूर इत्यादींमुळे प्रदूषणाच्या प्रमाणात वाढ होत असते.
दरम्यान, महानगरपालिकेतर्फे २०२४ मध्ये २८ मुद्यांचा समावेश असलेली मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली. त्यात बांधकाम प्रकल्पाच्या सभोवताली धूळप्रदूषण रोखण्यासाठी पत्र्यांचे कुंपण उभारणे, हिरव्या कपडयांचे आच्छादन करणे, पाणी-फवारणी करणे, राडारोडयाची शास्त्रशुध्द ने – आण करणे, बांधकामाच्या ठिकाणी वायू-प्रदूषण मोजमाप करणारी यंत्रणा बसविणे, धूरशोषक यंत्रे बसविणे व इतर महत्वाच्या उपाययोजना सुचविण्यात आलेल्या आहेत.
या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी विभाग स्तरावर भरारी पथके तैनात करण्यात आली असून मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणा-यांविरुध्द कठोर कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार १ ते ३१ डिसेंबर या कालावधीत हवा प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या ५५७ बांधकामांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तसेच २३३ ठिकाणी ‘काम थांबवण्याची नोटीस’ देण्यात आली आहे.
१,०८० बांधकामाच्या ठिकाणी हवा गुणवत्ता मापन यंत्रे
संबंधित क्षेत्रात हवा गुणवत्ता निर्देशांक २०० च्या वर गेल्यामुळे संबंधित क्षेत्रामध्ये ‘जीआरएपी ४’ अंतर्गत बांधकामे थांबविण्यात आली आहेत. तसेच प्रत्येक बांधकामांवर वायु गुणवत्ता मापन संयंत्रे बसविणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. त्यानुसार आतापर्यंत एकूण १,०८० बांधकामांनी संबंधित संयंत्रे बसविली आहेत.
