जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम विरोधक करत आहेत – कपिल पाटील

टिटवाळा येथे महायुतीच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन

कल्याण : नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीबाबत विरोधकांकडून पोलिसांनी नेलं, दबाव टाकला हे आरोप दिशाभूल करणारे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करून मतं डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी केली. टिटवाळा येथे प्रभाग क्र.३ मध्ये भाजपाच्या उमेदवार व माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, संतोष तरे, शिवसेनेचे बंदेश जाधव तसेच हर्षाली चौधरी थवील हे महायुतीचे चार उमेदवारांच्या निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटना प्रसंगी पत्रकारांशी बोलतांना केली.

ठाण्यात बिनविरोध नगरसेवक निवड करण्यासाठी पोलिसच उमेदवाराला एकनाथ शिंदे यांच्याकडे घेऊन गेल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गट आणि मनसेने केला होता. याला प्रत्युत्तर देतांना माजी मंत्री कपिल पाटील यांचा मनसे आणि शिवसेना ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला. सगळे एकत्र येऊन काही चालत नाही म्हणून भाजपला बदनाम करण्याचं काम करत आहेत. बिनविरोध निवडी बाबत विरोधकांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिल्याबाबत कपिल पाटील यांनी, राज्यात देशात ज्या ज्या तरतुदी आहेत त्याचा त्यांनी फायदा घ्यावा. जिथे  कायद्याने अधिकार दिलाय त्या ठिकाणी त्यांनी  समाधान होईपर्यंत न्याय मागावा असा टोला लगावला.

उमेदवारांना पोलीसच एकनाथ शिंदे यांच्याकडे घेऊन गेले त्यांनी सांगितले हे सर्वांनी मान्य केलं, मात्र त्याच मनसेच्या उमेदवाराने माझ्या मर्जीने मी दुसऱ्या कामासाठी बाहेर गेलो असे स्पष्ट केले आहे. जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम विरोधक करत आहेत यांना काहीतरी निगेटिव्ह पाहिजे, जनतेला संभ्रमामध्ये टाकायचं जनतेची दिशाभूल करायची आणि मत आपल्याला कशी मिळतील हे बघायचं हे विरोधकांचं काम सुरु आहे. तर तुमचेही बिनविरोध आले असते मात्र तुम्ही प्रयत्नच केले नाही. प्रयत्न करावे लागतात आपोआप कोणी बिनविरोध होत नाही असा टोला देखील कपिल पाटील यांनी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेला लगावला.

कपिल पाटील यांनी सर्व उमेदवारांना विजयासाठी शुभेच्छा देऊन महायुतीच्या बहूमतासाठी कार्य करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. या वेळी शिवसेनेचे कल्याण पश्चिमचे शहरप्रमुख रवी पाटील, प्रेमनाथ म्हात्रे, शक्तिवान भोईर, स्वप्निल काटे, मधुकर भोईर, विजय भोईर, श्रीधर खिसमतराव, दीपक कांबळे, रमण तरे,  ज्ञानेश्वर मढवी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *