दै. ‘पुढारी’चा आदर्श पत्रकार पुरस्कार पत्रकार आनंद सकपाळ यांना प्रदान
अशोक गायकवाड
रायगड-अलिबाग : अलिबाग येथे आयोजित विशेष समारंभात नेरळ येथील पत्रकार आनंद सकपाळ यांना दैनिक पुढारीचा ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार आमदार अनिकेत तटकरे यांच्या हस्ते गौरवपूर्वक प्रदान करण्यात आला. यावेळी दैनिक पुढारीचे निवासी संपादक शशिकांत सावंत तसेच अलिबाग आवृत्तीचे संपादक जयंत धुळप उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पत्रकारितेतील मूल्यनिष्ठा, सामाजिक बांधिलकी व वस्तुनिष्ठ वार्तांकनासाठी आनंद सपकाळ यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करण्यात आला. नेरळ परिसरातील विविध सामाजिक, ग्रामीण व जनहिताच्या प्रश्नांना सातत्याने व निर्भीडपणे वाचा फोडणाऱ्या आनंद सकपाळ यांच्या पत्रकारितेची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना आनंद सकपाळ यांनी दैनिक पुढारी व्यवस्थापन, संपादकीय टीम तसेच वाचकांचे आभार मानले. हा सन्मान अधिक जबाबदारीने व प्रामाणिक पत्रकारिता करण्याची प्रेरणा देणारा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.या प्रसंगी पत्रकार, मान्यवर तसेच विविध क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
