पुण्याप्रमाणे नाशिकही सजणार!
एअर शोमुळे पर्यटनाची झेप; स्थानिकांना अर्थाजनाची सुवर्णसंधी
हरिभाऊ लाखे
नाशिक : भारतीय हवाई दलाचे जगप्रसिद्ध सूर्यकिरण ॲरोबॅटिक पथक अर्थात स्कॅट २२ व २३ जानेवारी रोजी गंगापूर धरण परिसरात नऊ विमानांच्या सहाय्याने चित्तथरारक हवाई कसरती सादर करणार आहे. या एअर शोच्या माध्यमातून पुण्यातील खडकवासला धरणाच्या धर्तीवर, नाशिकच्या पर्यटनाला चालना दिली जाणार आहे. दोन दिवसीय उपक्रमात तब्बल ६० ते ६५ हजार नागरिक सहभागी होण्याचा अंदाज आहे. यामध्ये स्थानिक हॉटेल, रिसॉर्ट व्यावसायिक व शेतकऱ्यांना सहभागी होऊन अर्थाजनाची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
नाशिक महोत्सवाची सुरुवात या ऐतिहासिक आणि चित्तथरारक सोहळ्याने होणार आहे. हवाई दलाच्या सूर्यकिरण ॲरोबॅटिक पथकाचा नाशिकमध्ये प्रथमच एअर शो होत आहे. नऊ ‘हॉक एएमके १३२’ विमाने एकाचवेळी आकाशात झेपावून विविध चित्तथरारक आकार आणि कसरती सादर करतील. हवाई दलाचे अफाट कौशल्य आणि व्यावसायिकतेचे दर्शन घडणार आहे. हवाई दल व पोलीस दलाच्या बँड पथकाची धूनही ऐकायला मिळेल. गंगापूर धरण क्षेत्रात मुख्य सोहळा २३ जानेवारी रोजी आहे. परंतु, आदल्या दिवशी म्हणजे २२ जानेवारीला हे पथक रंगीत तालीम करेल. म्हणजे सलग दोन दिवस हवाई कसरती पाहण्याची संधी उपलब्ध आहे. गर्दी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासन एअर शोची तिकीट विक्री करणार आहे.
गंगापूर धरण परिसराची दृश्यमानता चांगली असल्याने या भागाची निवड करण्यात आली. कार्यक्रमस्थळी स्टॉल्स उपलब्ध केले जातील. या उपक्रमात खासगी संस्था, हॉटेल, रिसॉर्टधारक, शेतकरी व बचत गटांना सहभागी केले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. गंगापूर धरणाच्या सभोवतालच्या ज्या भागातून एअर शो सहजपणे दिसेल, तेथील हॉटेल व रिसॉर्टधारक, शेतकरी हा शो पाहण्यास येणाऱ्यांना भोजन, पाण्यासह प्राथमिक सुविधा देऊन अर्थाजन करू शकतात. शेतकऱ्यांना मोकळ्या जागेत खुर्च्या व तत्सम व्यवस्था करता येईल. हे नियोजन करताना संबंधितांना केवळ स्थानिक पोलीस ठाण्यात अर्ज करून परवानागी घ्यावी लागणार असल्याचे प्रसाद यांनी नमूद केले.
पुण्यातील खडकवासला धरण परिसर पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्यात आले. त्याच धर्तीवर नाशिकला प्रमुख पर्यटनक्षेत्र म्हणून विकसित करण्याचे नियोजन असल्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. गंगापूर धरणावर सध्या बोट क्लब कार्यरत आहे. या ठिकाणी सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होते. नाशिकच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी पर्यटनावर प्रशासनाने लक्ष केंद्रीत केले आहे.
