भाजपाकडून नगरसेवकांना फक्त ‘रागा’चे डोस

सिध्देश शिगवण

अंबरनाथ :  अंबरनाथ नगरपालिकेत मित्रपक्ष एकनाथ शिंदेंना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने चक्क काँग्रेसशी हातमिळवणी केली आणि अवघ्या देशात एकच गहजब उडाला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या नगरसेवकांना फक्त रागाचे डोस देत ही युती तोडण्याचे आदेश दिलेत. तर काँग्रेसपक्षाने या संबधित नगरसेवकांवर कठोर कारवाई करीत भाजपासोबत युतीची शिक्षा म्हणून त्यांना पक्षातूनच निलंबित केले आहे.

भाजपाने आपला नगराध्यक्ष बसवल्यानंतर सर्वाधिक २७ नगरसेवक असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षासोबत हातमिळवणी करत ‘अंबरनाथ विकास आघाडी’ स्थापन केली. या गटाची नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. या गटात भाजपचे १४, काँग्रेसचे १२, तर राष्ट्रवादी (अजित पवार)चे चार व एक अपक्ष असे ३१ नगरसेवक आहेत. नगराध्यक्षांसह ही संख्या ३२ झाली. अंबरनाथ नगरपालिकेला भ्रष्टाचार आणि भयमुक्त करण्याकरता हा निर्णय घेतल्याचा दावा भाजपने केला. यानंतर भाजप आणि काँग्रेसच्या युतीवर सर्व स्तरावर टीका झाली. अखेर काँग्रेसने त्या नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे.
काँग्रेसने जारी केलेल्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे की, आपण अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविली असून आपल्या पक्षाचे बारा सदस्य निवडून आलेले आहेत. मात्र आपण प्रदेश कार्यालयास कोणतीही माहिती न देता अंबरनाथ नगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सदस्यांसोबत गटबंधन केल्याचे प्रसार माध्यमांद्वारे कळाले. ही बाब अत्यंत चुकीची असून पक्षशिस्तीचा भंग करणारी आहे. ही बाब लक्षात घेता प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून आपणास काँग्रेस पक्षामधून निलंबित करण्यात येत आहे. तसेच आपली ब्लॉक काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत आहे. त्याच प्रमाणे आपल्यासोबत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्या सर्व नगरसेवकांना सुद्धा पक्षामधून निलंबित करण्यात येत आहे.
“मी स्पष्ट शब्दात सांगतोय काँग्रेस आणि  एमआयएमसोबत कोणतीही आघाडी चालणार नाही. ही आघाडी तोडावी लागेल. जर स्थानिक पातळीवर ही गोष्ट कोणी केली असेल, तर ते चुकीचे आहे. हा शिस्तभंग आहे. याच्यावर कारवाई होणार. हे चालणार नाही. मी आदेश दिले आहेत आणि १०० टक्के यावर कारवाई होणार,” अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली नाराजी व्यक्त केली. “शहरवासीयांना अभिप्रेत असलेला विकास व्हावा, या दृष्टिकोनातून स्थानिक पातळीवर आम्ही एकत्रित आलो आहोत. शहराच्या शाश्वत विकासासाठी आम्ही कटिबद्ध राहू. द्वेषाचे राजकारण सोडून शहर विकासाचे राजकारण करू”, असे स्पष्टीकरण काँग्रेसचे गटनेते प्रदीप पाटील यांनी युतीच्या घोषणावेळी सांगितले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *