नागरीकांनी मतदान करुन मतदानाचा अधिकार बजवावा – अभिनव गोयल

कल्याण : गुरुवार,१५ जानेवारी रोजी नागरीकांनी मतदान करुन, आपला मतदानाचा अधिकार बजवावा, असे आवाहन कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक अधिकारी तथा आयुक्त अभिनव गोयल यांनी आज स्थायी समिती सभागृहात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेसमयी केले. यावेळी महापालिकेचे अतिरिक्त योगेश गोडसे, कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे, निवडणूक विभागाचे उपआयुक्त समीर भुमकर, आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीचे समन्वय अधिकारी बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते.

या सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी एकुण १५४८ मतदान केंद्र असून, एकुण ९ ठिकाणी स्ट्राँगरुमची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी क्र.१ ते ९ यांच्या अधिनस्त असलेल्या निवडणूक प्रक्रियेची मतमोजणी एकुण ८ ठिकाणी होणार आहे. महापालिकेने मतदान केंद्र निहाय मतदार यादी प्रदर्शित केलेली आहे. तसेच एकुण ११८२ मतदान केंद्रस्त‍रीय अधिकारी यांच्यामार्फत वोटर स्लीपचे वितरण करण्यात येणार आहे.

महापालिका निवडणूकीसाठी पूर्णपणे सज्ज असून, या निवडणूकीसाठी एकुण १७० झोनल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे १CU आणि उमेदवारांच्या संख्येनुसार BU उपलब्ध करुन दिले जाणार आहेत, मतदान केंद्रामध्ये नागरीकांना आपले मोबाईल फोन नेण्यास मनाई आहे, अशी माहिती महापालिका निवडणूक अधिकारी तथा आयुक्त अभिनव गोयल यांनी यावेळी दिली.

कल्याण परिमंडळ-३ चे पोलीस उपआयुक्त अतुल झेंडे यांनी  मतदान व मतमोजणीदिवशी पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या तयारीची, बंदोबस्ताची माहिती विषद केली. त्याचप्रमाणे मतदानापूर्वी ,मतदानाचे दिवशी व मतमोजणीच्या दिवशी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात राहील अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *