महाराष्ट्राचे ‘डेथ वॉरंट’ काढलंय
राज ठाकरेंचा भाजपावर घणाघात
मुंबई : भाजपाकडून महाराष्ट्राचे डेथ वॉरंट काढण्यात आले आहे. मराठी माणसाच्या सहीनं मराठी माणसाचं डेथ वॉरंट काढलं जातंय, असा घणाघाती आरोप राज ठाकरे यांनी भाजपावर केलाय. ‘दैनिक सामना‘साठी संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी राज ठाकरे यांनी ‘मूळ मुंबईकर‘ ही संकल्पना मांडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जबरदस्त हल्लाबोल केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूरचे. बाकीचेही सगळे बाहेरचे. मुंबईत मुंबईकरांना काय पाहिजे, हे मला असं वाटतं की तुम्हाला तिथं जन्माला आल्याशिवाय कळणार नाही. बाहेरून येऊन जेव्हा तुम्ही एखादा देश बघता, शहर बघता ना, तुम्हाला समजणारच नाहीत की तिथले प्रश्न काय आहेत ते. उदाहरणार्थ समजा, तुमचा गृहनिर्माण मंत्री किंवा पीडब्ल्यूडी मिनिस्टर किंवा अजून कोणीतरी हे जेव्हा बाहेरचे असतात, ते जेव्हा मुंबईत येतात, तेव्हा त्यांना प्रश्न पडतो की, साला प्रॉब्लेम काय आहे या शहराचा? रस्ते आहेत, हॉस्पिटल आहेत, दिवे आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, पाणी आहे 24 तास. इथले प्रॉब्लेम काय आहेत? कारण तो कम्पॅरिजन करतो त्याच्या रस्त्यांशी, त्याच्या लोड लोडिंगशी, त्याच्याकडच्या सगळ्या गोष्टींशी. त्याच्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात. तुमची मानसिकता कशी आहे यावर सगळं अवलंबून आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
उत्तर भारतातून महाराष्ट्रात रोज ५६ ट्रेन येतात,
महाराष्ट्रातील स्थिती आज गंभीर झालीय. जेवढे लोक आज महाराष्ट्रामध्ये येतात, तेवढे आधी येत नव्हते. म्हणजे आज तुम्ही बघितलं तर उत्तरेतून जवळपास रोज ५६ ट्रेन महाराष्ट्रात येतात. भरून येतात आणि रिकाम्या जातात. ठाणे जिल्हा पहा. हा जगातला एकमेव असा जिल्हा आहे, जिथे ८ ते ९ महानगरपालिका आहेत. ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, यांचा डोलारा फक्त मोदींवर अवलंबून आहे! भिवंडी, त्यात पालघर जिल्हा वेगळा पकडू नका. वसई-विरार, मीरा-भाईंदर… म्हणजे जवळपास ८ ते ९ महापालिका आहेत. याची सुरुवात होते ग्रामपंचायत, पंचायत, नगरपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिका… लोकसंख्येनुसार हे स्वरूप बदलत जाते. आज मुंबईत एक महानगरपालिका आहे, पुण्यात दोन आहेत. ठाणे जिल्ह्यात 8 ते 9 महानगरपालिका. याचं कारण काय? याचं कारण बाहेरून येणाऱ्यांचं वाढलेलं प्रमाण. तेच प्रमाण मुंबईत वाढतंय, याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
