मुक्त विद्यापीठात तीन दिवसीय बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
हरिभाऊ लाखे
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात ‘समावेशक व समताधिष्ठित शिक्षण : नवीन शैक्षणिक धोरण – २०२० च्या परिप्रेक्ष्यात वैविध्यपूर्णतेसाठी शिक्षकांची सज्जता’ या विषयावरील बहुविद्याशाखीय राष्ट्रीय परिषद तसेच कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशन फाउंडेशन (CTEF – सीटीईएफ) यांच्या ३९ व्या वार्षिक परिषदेचे उद्घाटन दिल्ली येथील राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन विद्यापीठ (NUEPA) यांच्या कुलगुरू प्रा. शशिकला वंजारी यांच्या हस्ते झाले. विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखा व सीटीईएफ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही तीन दिवसीय परिषद ८ ते १० जानेवारी २०२६ दरम्यान होत आहे. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे होते.
विद्यापीठाच्या शैक्षणिक इमारतीतील सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ (पिंपरी–पुणे) चे कुलगुरू प्रा. एन. जे. पवार, सीटीईएफचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. के. एम. भांडारकर, सीटीईएफच्या आंतरराष्ट्रीय सचिव प्रा. नीलिमा भगवती, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विद्यापीठ व्यवस्थापन मंडळ सदस्य तथा शिक्षणशास्त्र विद्याशाखेच्या संचालिका डॉ. संजीवनी महाले तसेच निरंतर शिक्षण विद्याशाखेचे संचालक डॉ. जयदीप निकम यांची प्रमुख उपस्थिती होती.
उद्घाटनपर भाषणात कुलगुरू प्रा. शशिकला वंजारी म्हणाल्या की, विकसित भारत – २०४७ चे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भारतीय शिक्षणपद्धती ही सर्वसमावेशक, समताधिष्ठित व निरंतर असणे आवश्यक आहे. भारताची सांस्कृतिक परंपरा, गुरु–शिष्य परंपरा आणि मूल्याधिष्ठित शिक्षण लक्षात घेऊन शिक्षणव्यवस्था विकसित झाली पाहिजे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण – २०२० मध्ये यालाच प्राधान्य देण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षणसंस्थांनी अभ्यासक्रमाची दिशा आणि शिक्षकांची गुणवत्ता यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. वाढत्या खासगी शिक्षणसंस्थांतील शिक्षक व शिक्षणाची गुणवत्ता तपासली गेली पाहिजे. भविष्यातील दृष्टीने शिक्षक शिक्षणाची सुरुवात नेमकी कुठून करायची, हे ठरवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे त्या म्हणाल्या. मुक्त विद्यापीठ विविध शिक्षणक्रमांद्वारे करत असलेले कार्य विकसित भारत – २०४७ चे लघुरूप असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. सीटीईएफच्या कार्याचाही त्यांनी गौरव केला.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी विकसित भारत – २०४७ चा विचार करताना देशाच्या विकासासाठी उपलब्ध ज्ञान, साधने आणि परिस्थितीनुसार प्रत्येकाने स्वतःची भूमिका निश्चित करावी, असे आवाहन केले. सीटीईएफचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. के. एम. भांडारकर यांनी भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) प्रमाणे भारतीय शिक्षण सेवा सुरू करावी, तसेच प्राथमिक ते विद्यापीठ स्तरावरील शिक्षकांसाठी राष्ट्रीय पातळीवर स्वतंत्र निधी (फंड) ची कायमस्वरूपी व्यवस्था उभारण्यात यावी, अशी मागणी केली. सीटीईएफच्या आंतरराष्ट्रीय सचिव प्रा. नीलिमा भगवती यांनी संघटनेच्या कार्याची माहिती देताना नेपाळ व भूतानमध्ये संघटनेचे कार्य सुरू असून, आगामी काळात थायलंड व श्रीलंका येथेही कार्य विस्तारण्याचे नियोजन असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते ‘ दूरस्थ शिक्षण पद्धतीने शिक्षकांचे शिक्षण: मुक्त विद्यापीठाच्या बी. एड. शिक्षणक्रमाचा चिकित्सक अभ्यास’ या व परिषदेतील शोधनिबंध सारांश या दोन पुस्तिकांचे प्रकाशन करण्यात आले.
दुपारच्या सत्रात विकसित भारत – २०४७ या विषयावर कुलगुरू प्रा. शशिकला वंजारी यांच्या नेतृत्वाखाली परिसंवाद घेण्यात आला. यामध्ये कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे, डॉ. के. एम. भांडारकर, डॉ. गजानन गुल्हाने आणि हिमाचल प्रदेशचे प्रा. मनोज सक्सेना यांनी सहभाग घेत आपले विचार मांडले. दिवसाच्या अंतिम सत्रात सहभागी विद्यार्थ्यांनी आपले शोधनिबंध सादर केले. परिषद समन्वयक डॉ. संजीवनी महाले यांनी प्रास्ताविक केले. श्रीमती शुभांगी पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
चौकट : या कार्यक्रमात सीटीईएफतर्फे विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांना ‘आयकॉन ऑफ टीचर एज्युकेशन’ पुरस्काराने, तर राष्ट्रीय शैक्षणिक नियोजन आणि प्रशासन विद्यापीठ (NUEPA) च्या कुलगुरू प्रा. शशिकला वंजारी यांना ‘अवॉर्ड ऑफ एक्सेलेन्स इन टीचर एज्युकेशन’ या पुरस्काराने गौरविण्यात आले.
