आनंद भारती, महाराष्ट्र लोककलावंततर्फे राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
ठाणे : श्री आनंद भारती समाज आणि महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने निमंत्रितांच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती श्री आनंद भारती समाजाचे सचिव संदिप कोळी यांनी दिली. महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठानच्या १७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून होणारी ही स्पर्धा रविवार, १८ जानेवारी रोजी दुपारी ३ ते रात्री १० वाजेपर्यंत श्री आनंद भारती समाजाच्या सभागृहात रंगणार असल्याचे महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठानचे सचिव विनोद नाखवा यांनी सांगितले.विनोद नाखवा म्हणाले, या स्पर्धेत अभिव्यक्ती गोरेगाव, सोहम साधना ग्रुप, नटराज क्रीएशन आदी नामांकित संस्था सहभागी होतील. स्पर्धेतील विजेत्यांना रोख सहा हजार, उपविजेत्यांना रोख चार हजार तृतीय क्रमांकाच्या विजेत्यांना रोख दोन हजार रुपयांच्या बक्षिसाने सन्मानित करण्यात येईल. याशिवाय उत्कृष्ट अभिनय आणि दिग्दर्शकाला रोख बक्षिसाने सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे औचित्य साधून दिवंगत रंगकर्मी मधुसूदन सुखदरे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येईल. याशिवाय सिनेकलावंत अशोक समेळ, शलाका संतोष पवार, लावणी क्वीन प्रियांका शेट्टी, आंतरराष्ट्रीय रिदमिस्ट अभिजीत कोळी, दैनिक पुढारीच्या प्रतिनिधी अनुपमा गुंडे यांना महाराष्ट्र लोकगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
