कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी मुंबईत रंगणार
महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने २९ व ३० जानेवारी २०२६ रोजी ३ री महाराष्ट्र ओपन कॅरम चॅलेंजर्स ट्रॉफी २०२५-२०२६ चे आयोजन मुंबईत करण्यात आले आहे. श्री हालारी ओसवाल समाज, दादासाहेब फाळके रोड, रणजीत स्टुडिओ समोर, दादर (पूर्व ), मुंबई – ४०००१४ येथील भव्य वातानुकूलित हॉलमध्ये हि स्पर्धा रंगणार आहे. पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी खुला गट ठेवण्यात आला असून स्पर्धेतील विजेत्यांना तब्बल ८ लाखांची रोख पारितोषिके जाहिर करण्यात आली आहेत. विजेत्याला रोख रुपये १ लाख पन्नास हजार, उपविजेत्याला रोख रुपये १ लाख व चषक, तिसऱ्या क्रमांकासाठी ७५ हजार व चषक, चौथ्या क्रमांकासाठी ५० हजार शिवाय उपउपांत्य फेरीसाठी प्रत्येकी २५ हजार, उपउपांत्य पूर्व फेरीसाठी प्रत्येकी १० हजार व उपउपांत्यपूर्व फेरी अगोदरच्या फेरीत हरणाऱ्या खेळाडूस प्रत्येकी रुपये ५ हजारांचे ईनाम जाहीर करण्यात आले आहे. स्पर्धेच्या पहिल्या फेरीपासून व्हाईट स्लॅम व ब्लॅक स्लॅम करणाऱ्या खेळाडूस रोख रुपये १ हजारांचे बक्षीस तर उपउपांत्य फेरीपासून हे बक्षीस रुपये २ हजार ठेवण्यात आले. आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या महिला खेळाडूंना विशेष उत्तेजन देण्यासाठी सामना खेळून दुसऱ्या फेरीत प्रवेश करणाऱ्या महिलेस रोख रुपये १ हजार, तिसऱ्या फेरीत प्रवेश करणाऱ्या महिलेस रोख रुपये २ हजार, चौथ्या फेरीत प्रवेश करणाऱ्या महिलेस ४ हजार, पांचव्या फेरीत प्रवेश करणाऱ्या महिलेस रुपये ८ हजार तर सहाव्या फेरीत प्रवेश करणाऱ्या महिलेस रोख रुपये १५ हजारांचे अतिरिक्त ईनाम जाहिर करण्यात आले आहे. सिस्का कंपनीच्या शुअर स्लॅम कॅरम बोर्ड व बुलेट शॉट सोंगट्या वर हे सामने खेळविण्यात येणार आहेत. गेली दोन वर्षे या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनामुळे या स्पर्धेला वाढता प्रतिसाद मिळत आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या खेळाडूंना महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्यावतीने गणवेश देण्यात येणार असून खेळाडूंच्या चहा-नाश्ता व दुपारच्या भोजनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.
स्पर्धा जरी सर्वांसाठी खुली असली तरीही स्पर्धेत मर्यादित खेळाडूंना प्रवेश देण्यात येणार असून भाग घेणाऱ्या राज्यातील इच्छुक खेळाडूंनी आपल्या जिल्हा संघटनेमार्फत आपली नावे नोंदवावीत असे आवाहन करण्यात येत आहे. या स्पर्धेचे प्रवेश अर्ज महाराष्ट्र कॅरम असोसिशनच्या www.maharashtrcarromassociation.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. नावे नोंदविण्यासाठी खेळाडूंनी दिनांक ११ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ६ ते ८ दरम्यान महाराष्ट्र कॅरम असोसिएशन. पारेख महल बिल्डिंग, सखाराम कीर मार्ग, आश्रय हॉटेलच्या मागे, राजा राणी चौकजवळ, शिवाजी पार्क, दादर येथे संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक ९९८७०४५४२९ वर संपर्क साधावा.
