भाजपच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून मुख्यमंत्री पनवेलमध्ये
जगदीश गायकवाड यांचा घणाघात
राज भंडारी
पनवेल: भाजपच्या अपयशी कारभारामुळे जनतेचा विश्वास पूर्णपणे ढासळला असून त्यामुळेच मुख्यमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते पनवेलमध्ये प्रचारासाठी उतरले आहेत. हे भाजपच्या पाया खालची वाळू सरकल्याचे स्पष्ट लक्षण आहे, असा जोरदार हल्लाबोल महाविकास आघाडीचे नेते जगदीश गायकवाड यांनी केला. दिबांच्या नामकरणासारख्या भावनिक मुद्द्यांवर राजकारण करून जनतेची दिशाभूल करण्याचा भाजपचा प्रयत्न पुन्हा सुरू झाला आहे. प्रत्यक्षात प्रदूषण, भ्रष्टाचार, वाढते कर, पाणीटंचाई, निकृष्ट व अपुऱ्या नागरी सुविधा यामुळे नागरिकांना वेठीस धरणाऱ्या या सरकारला जनता धडा शिकवणार नसेल तर हेच लोक उद्या निवडणूक न लढवता हुकूमशाही पद्धतीने राज्य करतील, असा इशारा गायकवाड यांनी दिला.
महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला कर सवलत, वाहतूकदार वर्गाला कळंबोली भागात टोलमाफी, मुबलक पाणीपुरवठा, स्वच्छ हवा आणि सुरक्षित नागरी व्यवस्था देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे ठाम आश्वासन देत गायकवाड यांनी महायुतीच्या नेत्यांवर सडकून टीका केली. महायुतीला पराभवाची भीती असल्याने घोडेबाजार सुरू आहे. स्थानिक आमदार अपयशी ठरल्याने आता मुख्यमंत्री व बाहेरचे नेते पनवेलच्या प्रचारात उतरावे लागत आहेत, हीच त्यांच्या अपयशाची कबुली आहे, असा टोला त्यांनी लगावला.
कर, बसस्थानक, पाणी, कोविड काळातील संवाद या मूलभूत प्रश्नांवर मुख्यमंत्री जनतेशी बोलू शकले नाहीत. विकासाचे प्रश्न प्रलंबित ठेवून आता निवडणुकीच्या तोंडावर संवादाचे नाटक सुरू आहे. हा ठरवून आखलेला ‘सिझन’ असून नागरिकांनी कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन गायकवाड यांनी केले.
हिंदू, मुस्लिम, शीख, दलित, आगरी, कराडी, कोळी समाज बांधवांनी भाजपविरोधात निर्धार केला आहे. उरण पॅटर्न पनवेलमध्ये राबवा, ‘कामोठेकरांप्रमाणे दिबांचे नाव नाही तर भाजपला मत नाही’ ही मोहीम प्रभावीपणे राबवा, असे आवाहन करत “ना जात, ना पात – मोहर लागेल हातावर” असा ठाम नारा जगदीश गायकवाड यांनी दिला.
