राज ठाकरे यांचा ठाण्यात झंझावात..!
प्रभाग क्र 8 मधील उमेदवारांचा थेट घराणेशाहीवर हल्ला..
ठाणे – (सिद्धेश शिगवण)
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभांऐवजी पक्षाच्या शाखा आणि उमेदवारांच्या कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी देण्यावर भर देण्याचा निर्णय घेतला असून, त्यानुसार गुरुवारी ८ जानेवारी सायंकाळी ५ वाजता त्यांनी ठाण्यातील मनसे उमेदवारांच्या पक्ष कार्यालये व शाखांना भेट दिली.ठाणे महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेने यंदा ठाण्यात महायुतीला कडवी टक्कर देण्यासाठी मनसेकडून २८ मराठी उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहेत.
ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या या शिलेदारांना प्रोत्साहन देण्यासाठी राज ठाकरे स्वतः ठाण्यात दाखल झाले. सायंकाळी ५ वाजल्यापासून त्यांचा दौरा सुरू झाला, विविध पक्ष कार्यालये व शाखांमध्ये त्यांनी उमेदवार आणि कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला.राज ठाकरे यांच्या या भेटीनंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला. ठिकठिकाणी घोषणाबाजी करत, फटाके फोडून व जल्लोष करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. राज साहेबांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला असून, निवडणुकीत मनसे ठाण्यात निर्णायक भूमिका बजावेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
चौकट :-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटी नंतर माजिवडा प्रभाग क्रमांक 8 चे उमेदवार सचिन कुरेल, कोमल वाडेकर, वर्षा पाटील,लॉरेन्स डिसोझा यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह विरोधी पक्षाच्या कार्यालयासमोर जल्लोष साजरा केला. तर माध्यमांसमोर बोलताना सचिन कुरेल यांनी सांगितले कि आम्ही घराणेशाही च्या विरोधात प्रभागाच्या विकासासाठी निवडणूक लढवत आहोत. विरोधक फक्त घराणेशाही करतात सर्व उमेदवार त्यांच्या घरातले मग 20 वर्षात विकास का नाही झाला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
