रायगड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची जलसमृद्धीच्या दिशेने वाटचाल
एकाच दिवशी ७७८ ठिकाणी केली वनराई बंधारे उभारणी
मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी दिली माहिती
अशोक गायकवाड
रायगड-अलिबाग: शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची संपूर्ण प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी एकाच दिवशी श्रमदान कार्यक्रम राबवून ७७८ ठिकाणी वनराई बंधारे बांधण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी दिली आहे. यामुळे ग्रामपंचायती जलसमृ़द्ध होण्यास मदत होणार असून त्यांची पाण्याची समस्या दूर होणार आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत हा विशेष उपक्रम जिल्हाभरात राबविण्यात आला आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढवणे, शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारणे तसेच ग्रामीण भागात जलसंधारणास चालना देणे हा आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधी, अधिकारी व ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यानिमित्ताने मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भासले, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे यांनी महाड व पोलादपूर तालुक्यात बांधण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्याचप्रमाणे येथील विविध ग्रामपंचायतींना भेट देत समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत राबविण्यात येणा-या उपक्रमांचा आढावा घेउन ग्रामस्थांशी संवाद साधला. मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांनी उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची मुदत शासनाने वाढविली असल्याने रायगड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी अशाच उत्स्फूर्तपणे व नियोजनबद्ध पद्धतीने उर्वरित कामे पूर्ण करावीत असे आवाहन केले. अलिबाग तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या ६२, कर्जत तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या ५५, खालापूर तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या ४४, महाड तालुक्यातील १३४ ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या ८३, माणगाव तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या ५७, म्हसळा तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या ३९, मुरुड तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या ५०, पनवेल तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या ७०, पेण तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या ७२, पोलादपूर तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या ३३, रोहा तालुक्यातील ६४ ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या ६१, श्रीवर्धन तालुक्यातील ४३ ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या ३९, सुधागड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या ३६, तळा तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या ३९, उरण तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींमध्ये बांधलेल्या वनराई बंधाऱ्यांची संख्या ४, अशा एकूण ८११ ग्रामपंचायतींमध्ये एकूण ७७८ वनराई बंधारे बांधण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *