वंदे मातरम आता ‘व्होट बँक मातरम’ बनलंय – शहजाद पूनावाला
अनिल ठाणेकर
ठाणे, राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक असलेले “वंदे मातरम” आता व्होट बँक मातरम बनले आहे. काही लोकांकरीता ही व्होट बँकेच सर्वस्व बनली आहे, अशी टीका भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी काँग्रेसवर केली असुन देशाच्या विभाजनाचे बीज याच वंदे मातरम गीताच्या विभाजनात दडल्याचे सांगितले. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेचे पहिले पुष्प ‘वंदे मातरम’ आणि राष्ट्रीय पुनुरुत्थान” या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक चळवळीमध्ये महत्वाचे स्थान असलेली रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमाला, (वर्ष ४० वे) ८ जानेवारी ते १४ जानेवारी दरम्यान नौपाड्यातील सरस्वती क्रीडा संकुलाच्या मैदानात सुरू आहे. या व्याख्यानमालेचे उद्घाटन गुरूवारी भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला, डॉ. राजीव पुरी, ज्येष्ठ पत्रकार किरण तारे, मिलिंद भागवत ह्या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी व्यासपीठावर व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष आमदार संजय केळकर, सचिव शरद पुरोहीत उपस्थित होते. तर, श्रोत्यांमध्ये माजी उपमहापौर सुभाष काळे, टीजेएसबीचे विद्याधर वैशंपायन, प्रा.किर्ती आगाशे, समतोल फाऊंडेशनचे विजय जाधव आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. या परिसंवादात पत्रकार किरण तारे आणि मिलिंद भागवत यांनी शहजाद पुनावाला आणि डॉ. राजीव पुरी यांना विविध प्रश्नांवर बोलते केले. मुस्लिमांच्या तुष्टीकरणासाठी किंबहुना मुस्लीम मतपेढी जपण्यासाठी त्यावेळी पंडीत जवाहरलाल नेहरूंनीच वंदे मातरमचे दोन तुकडे केले. त्यानंतरच अखंड भारताचे दोन तुकडे झाले. असे स्पष्ट करताना पुनावाला यांनी, १९३७ साली नेहरूंनीच दबावाखाली येत नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बॅ.जीना यांना पत्र लिहुन वंदे मातरमचे तुकडे पाडल्याचे सांगितले. नंतर राष्ट्रीय गीत म्हणुन “वंदे मातरम” स्विकारले गेले मात्र, मुस्लीम धर्माच्या विरोधात असल्याचे सांगत “वंदे मातरम” बोलण्यास नकार देणे ही दुःखदायक बाब असल्याची खंत पुनावाला यांनी व्यक्त केली. भाजपकडून उठसुठ नेहरूंवर खापर फोडले जाते या प्रश्नावर त्यांनी, खरा इतिहास जनतेला सांगण्याचा हा प्रयत्न असल्याचे सडेतोड उत्तर दिले. यावर डॉ. पुरी यांनीही तत्कालीन काँग्रेस धुरीणांनी इतिहास बदललाच नाही तर इतिहासाची मोडतोड केल्याचे सोदाहरण श्रोत्यांसमोर मांडले. आजही भारतीयत्वाला नाकारणाऱ्यांची व्होट बँक काँग्रेस बनवत आहे. भारतीयांना जातीजातीत विभागुन आपली विशिष्ट मतपेढी मजबुत करण्याची काँग्रेसची निती आहे. आजही असेच लांगुललाचन काही जणांकडून सुरू आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना आता सोनिया सेना बनली असुन “उर्दु भाईजान तंजीम” म्हणजेच युबीटी बनली आहे. हेच व्होट बँकेचे राजकारण असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी देश विदेशात मंदिर, चर्च मध्ये जातात पण मशिदीत जात नाहीत? या प्रश्नावर, मोदी मशिदीतही जातात, पण मशिदीत जाऊन नमाज पढत नाहीत, कारण ते हिंदु आहेत. असे स्पष्ट करून पुनावाला यांनी, गेली ३३ वर्षे गुजरातमध्ये भाजपचे सरकार आहे परंतु इतर सेक्यूलर राज्यांपेक्षा गुजरातेतील मुसलमान आर्थिक तसेच सर्वच दृष्टीने सबळ बनला असल्याचे दाखले दिले.आज लोकशाही बदलण्याचा डाव आखला आहे, या आरोपांचे खंडन करताना पुनावाला यांनी, ईव्हीएम, व्होट चोरी आणि आता एसआयआर वरून ऊर बडवणाऱ्या विरोधकांचा दुटप्पीपणा श्रोत्यांसमोर उघड केला. यावेळी भागवत यांनी, शताब्दी वर्ष साजरे करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल होत असलेला अपप्रचार तसेच, आज संघाची कशी गरज आहे, यावर वक्त्यांना बोलते केले. तर, प्रास्तविकात संजय केळकर यांनी, त्यांच्या अध्यक्षतेखाली गेली ४० वर्षे अखंडीतपणे सुरु असलेल्या रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेच्या सांस्कृतिक चळवळीचा आढावा घेत अनेक आठवणी वृद्धींगत केल्या.
