विझू न देण्याची जिद्द: क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम”
हेमंत ढोमे लिखित व दिग्दर्शित “क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम” हा चित्रपट थेट प्रेक्षकांच्या मनाला हात घालतो आणि विचार करायला भाग पाडतो. अवघ्या १ तास ४९ मिनिटांच्या कालावधीत हा चित्रपट मराठी भाषा, मराठी शाळा आणि मराठीतून शिक्षण घेऊन घडलेल्या पिढीचा ठोस, वास्तववादी आणि प्रभावी आरसा उभा करतो. २०२६ च्या सुरुवातीलाच हा चित्रपट आला आणि मराठी माध्यमाविषयी नव्याने चर्चा सुरू झाली.
कथा
चित्रपटाची कथा अलिबागजवळील नागाव येथील क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम या ९० वर्षे जुन्या शाळेभोवती फिरते. काळाच्या ओघात आणि खोट्या ऑडिट रिपोर्टच्या आधारे ही शाळा बंद करून त्या जागी ‘इंटरनॅशनल स्कूल’ उभारण्याचा डाव आखला जातो. शाळेच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहतं. या संकटसमयी शाळेचे मुख्याध्यापक दिनकर शिर्के गुरुजी आणि माजी विद्यार्थी बबन शाळेच्या जुन्या विद्यार्थ्यांना पुन्हा एकत्र आणतात. सुरुवातीला ही लढाई थोड्या विनोदी, हलक्याफुलक्या पद्धतीने सुरू होते; मात्र जसजशी गोष्ट पुढे सरकते, तसतशी ती गंभीर व विचारप्रवर्तक बनते. पुढे काय होते त्यासाठी चित्रपट बघण्यास जा .
दिग्दर्शन
हेमंत ढोमे यांनी कमी कालावधीत भरपूर आशय मांडला आहे. अनावश्यक मेलोड्रामा टाळत त्यांनी पात्रे आणि कथावस्तू यांवर ठाम भर दिला आहे. कलाकारांकडून संयमी पण प्रभावी अभिनय करून घेतला आहे.
“आपल्या मराठी भाषेची लाज वाटते… या पृथ्वीवर कदाचित पहिलीच जमात असेल तिला आपल्या आईची लाज वाटते” किंवा“छापखाना आणि कारखान्यात फरक असतो; कारखान्यात माणसं घडतात”असे संवाद थेट प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडतात.एक वेगळं ऊर्जा ,नवं चैतन्य चित्रपट गृहात बघण्यास मिळते.
अभिनय
अमेय वाघ याचा बबन हा संपूर्ण चित्रपटाचा कणा आहे. आगरी बोलीतील ही त्याची पहिली भूमिका असून ती अत्यंत प्रभावी झाली आहे.पाजक्ता कोळी अंजली या संशोधकाच्या भूमिकेत शांत, विचारशील आणि शाळेची हुशार विद्यार्थी आहे . पहिला मराठी चित्रपट असूनही तिचा अभिनय सहज वाटतो. क्षिती जोग सलमा हसीना अंतुले या केंद्र सरकारी अधिकाऱ्याच्या भूमिकेत ठामपणे लक्ष वेधून घेतात.हरीश दुधाडे राकेश या वकील आणि शेतकऱ्याच्या भूमिकेत जमिनीशी जोडलेली मूल्यं प्रभावीपणे मांडतात.कादंबरी कदम आणि पुष्कराज चिरपुटकर दुबईतील यशस्वी व्यावसायिक असूनही आपल्या शाळेची ‘क्रांतिज्योती’ विझू न देण्याची जिद्द ठसठशीतपणे व्यक्त करतात.या सगळ्यांच्या केंद्रस्थानी सचिन खेडेकर मुख्याध्यापक दिनकर शिर्के म्हणून उभे राहतात. त्यांच्या संयमी , ठाम आणि भारदस्त अभिनयामुळे ही क्रांतिज्योती अधिक तेजाळते. निर्मिती सावंत नार्वेकरबाईंच्या भूमिकेत नेहमीप्रमाणे सहजसुंदर वाटतात. शिक्षणमंत्री म्हणून जितेंद्र जोशी लक्षात राहतात.
तांत्रिक बाजू/गीत
हर्ष-विजय यांचं संगीत कथेला योग्य साथ देतं. ईश्वर अंधारे यांची गीतं आशयाला साजेशी आहेत. पार्श्वसंगीत कुठेही आक्रस्ताळं किंवा अनावश्यक वाटत नाही.
सत्यजीत शोभा श्रीराम यांचं छायांकन वास्तवदर्शी आहे. शाळेचे वर्ग, मैदान आणि परिसर आपलेसे वाटतात. भावेश तोडणकर यांचं संकलन विषयाच्या गांभीर्याशी सुसंगत आणि संतुलित आहे
चित्रपट संपल्यानंतर मराठीतून शिक्षण घेऊन घडलेल्या व्यक्तींची नावं, हुद्दे आणि चेहरे पडद्यावर झळकतात. तेव्हा प्रेक्षक स्वतःलाच प्रश्न विचारतो
आपण कोणत्या शाळेत शिकलो? त्या शाळेने आपल्याला काय दिलं? आणि आज आपण आपल्या मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत का घालत नाही?
“क्रांतिज्योती विद्यालय –मराठी माध्यम” हा केवळ चित्रपट नाही, तर मराठी भाषा आणि शिक्षणाविषयीची एक शांत पण ठाम क्रांती आहे.
संपदा सावंत
