निवडणूक कर्तव्यावर नियुक्त ४३० कर्मचा-यांनी पहिल्या दिवशी केले पोस्टल मतदान
नवी मुंबई : (अशोक गायकवाड )
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीत प्रत्येक मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावावा याकरिता पॅम्पेलेट्स, पोस्टर्स, बॅनर्स, ऑडिओ, व्हिडीओ, डिजीटल तसेच सोशल मिडीया अशा विविध माध्यमांतून व्यापक स्वरूपात जनजागृती करण्यात येत आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध स्वरुपात प्रचार प्रसार करतांनाच निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी मोठया संख्येने निवडणूक कर्तव्यावर कार्यरत असणा-या शासकीय – निमशासकीय कर्मचारी यांचा मतदानाचा हक्क डावलला जाऊ नये याकरिता महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आठही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात टपाली मतदान सुविधा केंद्रे कार्यरत करण्यात आलेली आहेत. १५ जानेवारी रोजी होणा-या नमुंमपा निवडणूकीमध्ये कर्तव्यासाठी नेमणूक झालेल्या १३९ महिला व २९१ पुरुष अशा ४३० कर्मचा-यांनी शनिवार १० जानेवारी रोजी पहिल्या दिवशी टपाली मतदान करुन आपला मतदानाचा हक्क बजावला अशी माहिती उपआयुक्त तथा पोस्टल मतदान नोडल अधिकारी स्मिता काळे यांनी दिली. मतदान केल्यानंतर या कर्मचा-यांनी “आम्ही मतदान केले, तुम्हीही मतदान करा” असे आवाहन सेल्फी काढत सर्व मतदार नागरिकांना केले. निवडणूकीसाठी मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतदानाच्या दिवशी कर्तव्यावर कार्यरत असल्याने मतदान करण्याची संधी उपलब्ध होणार नसल्याने महानगरपालिकेने पोस्टल मतदानाची प्रक्रिया प्रभावीपणे राबवली आहे. त्यासाठी आठही विभागातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांमध्ये टपाली मतदान सुविधा केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहेत. नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीकरिता प्राधान्याने रायगड जिल्हयातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच नवी मुंबईतील सिडको व इतर शासकीय – निमशासकीय कार्यालये, खाजगी शाळा तसेच पोलीस विभाग येथील कर्मचाऱ्यांची निवडणूक कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. अशा कर्मचाऱ्यांकरिता तसेच जे कर्मचारी नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मतदार आहेत मात्र त्यांची नेमणूक इतर शहरांमध्ये निवडणूक कर्तव्यावर झालेली आहे अशा कर्मचा-यांना मतदान करता यावे यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार व नियमानुसार स्थापन करण्यात आलेल्या या विशेष टपाली मतदान सुविधा केंद्राचा लाभ घेऊन निवडणूक कर्तव्यावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मतदान करावे असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *