महाप्रचार रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
आशीर्वाद देण्यासाठी नागरिक रस्त्यावर
दिवा, दि. ११ डिसेंबर : ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ अंतर्गत शिवसेना–भाजपा– आर.पी.आय. महायुतीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रभाग क्रमांक २७ च्या शैलेश पाटील, स्नेहा पाटील, दिपाली भगत आणि ऍड. आदेश भगत या चारही उमेदवारांच्या महाप्रचार रॅलीला दिवा परिसरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रविवारी सायंकाळी आयोजित या रॅलीदरम्यान उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. रॅली मार्गावर ठिकठिकाणी नागरिकांनी फुलांची उधळण करत, घोषणा देत उमेदवारांचे स्वागत केले. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिकांसह मोठ्या प्रमाणावर लोकसहभाग दिसून आला. नागरिकांची गर्दी एवढी वाढली की काही काळासाठी मुख्य रस्ता वाहतुकीसाठी बंद करावा लागला, त्यामुळे परिसरात उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
“काम करत आलो… काम करत राहू…” या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ निघालेल्या या रॅलीमुळे दिवा शहरात निवडणुकीचे वातावरण तापले असून, नागरिकांचा वाढता पाठिंबा स्पष्टपणे दिसून आला. रॅली शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कार्यकर्ते व स्वयंसेवकांनी चोख नियोजन केले होते. या महाप्रचार रॅलीने महायुतीच्या उमेदवारांना मोठे बळ दिल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *