अस्मिता खेलो इंडिया युथ वेटलिफ्टिंग अजिंक्य स्पर्धा
कल्याणच्या हर्षिणी चव्हाणला सुवर्णपदक
कल्याण : अस्मिता खेलो इंडिया राष्ट्रीय युथ वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राच्या हर्षिणी प्रशांत चव्हाण हिने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. ८ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान मोदीनगर, गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या या स्पर्धेत १७ वर्षांखालील वयोगटातील ४८ किलो वजनगटात हर्षिणीने आपले वर्चस्व सिद्ध केले.
स्पर्धेत हर्षिणीने स्नॅचमध्ये ६२ किलो आणि क्लिन अँड जर्कमध्ये ८० किलो असे एकूण १४२ किलो वजन यशस्वीरीत्या उचलत अव्वल स्थान मिळवले. तिच्या तांत्रिक अचूकतेसह ताकदीचे उत्कृष्ट प्रदर्शन पाहून पंच व प्रशिक्षकांनीही कौतुकाची थाप दिली. या यशामुळे महाराष्ट्राच्या वेटलिफ्टिंग परंपरेत आणखी एक सुवर्णअध्याय जोडला गेला आहे. मेहनत, शिस्त आणि सातत्य यांचे फळ मिळत असल्याचे हर्षिणीच्या कामगिरीतून स्पष्ट झाले. पुरस्कार वितरण सोहळा भारताची नामांकित वेटलिफ्टर आणि पद्मश्री पुरस्कार विजेती मिराबाई चानू यांच्या हस्ते पार पडला, हा क्षण हर्षिणीसाठी प्रेरणादायी ठरला. हर्षिणी चव्हाण हिचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून तिच्या पुढील क्रीडावाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *