जॉली जिमखाना कॅरम – घुफ्रानची विश्वविजेत्या प्रशांतवर मात
मुंबई: विद्याविहार ( पश्चिम ) येथील घाटकोपर जॉली जिमखान्याच्या वतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने ३ री घाटकोपर जॉली जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी गटात उपांत्य लढतीत मुंबईच्या आंतरराष्ट्रीय कॅरमपटू महम्मद घुफ्रानने मुंबईच्या विश्व् विजेत्या प्रशांत मोरेवर तीन सेटपर्यंत रंगलेल्या लढतीत १९-२५, २५-२३ व २५-११ अशी मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रशांत पहिला सेट जिंकला होता. परंतु दुसऱ्या सेटमध्ये सहाव्या सेटनंतर १४-१९ असा पिछाडीवर असताना घुफ्रानने व्हाईट स्लॅमची नोंद करत दुसरा सेट जिंकला आणि सामन्यात बरोबरी केली. तिसऱ्या सेटमध्ये घुफ्रानने सुरवातीपासूनच सामन्यावर पकड ठेवली आणि २५-११ असा सेट जिंकला. दुसरा उपांत्य फेरीचा अगदीच एकतर्फी झाला. ठाण्याच्या झैद अहमदने पुण्याच्या फार्मात असलेल्या सागर वाघमारेवर २२-९, २५-० अशी सहज मात करून अंतिम फेरी गाठली.
महिला एकेरीच्या उपांत्य लढतीत दीर्घ कालावधीनंतर मुंबईच्या आंतर राष्ट्रीय कॅरमपटू संगीता चांदोरकरने मुंबईच्या सोनाली कुमारीला २३-२१, २५-१० असे सरळ दोन सेटमध्ये हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात रत्नागिरीच्या आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदमने सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणवर रंगतदार लढतीत २-१९, २३-२१ व १४-१३ असा जेमतेम विजय मिळवला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *