योनेक्स सनराईज ठाणे जिल्हा रँकिंग बॅडमिंटन स्पर्धा
नववर्षातील ठाणे जिल्ह्यातील उभरत्या खेळाडूंसाठी पहिली मोठी जिल्हास्तरीय लढत
ठाणे शहर व जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन यांच्या वतीने आयोजित यॉनेक्स सनराईज ठाणे जिल्हा रँकिंग बॅडमिंटन स्पर्धा २०२६ ही स्पर्धा १७ जानेवारी ते २० जानेवारी २०२६ या कालावधीत दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलातील खंडू रांगणेकर बॅडमिंटन हॉल, खारटन रोड, ठाणे येथे खेळवण्यात येणार आहे.
नववर्षातील ठाणे जिल्ह्यातील बॅडमिंटन खेळाडूंसाठी ही स्पर्धा पहिली आणि अत्यंत महत्त्वाची जिल्हास्तरीय स्पर्धा मानली जात असून, आगामी स्पर्धात्मक हंगामासाठी स्वतःची तयारी, सातत्य आणि गुणवत्ता सिद्ध करण्याची ही एक निर्णायक संधी ठरणार आहे. विशेषतः नवोदित व उभरत्या खेळाडूंना जिल्हा पातळीवर स्वतःची छाप पाडण्यासाठी या स्पर्धेकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले जात आहे.
सदर स्पर्धा विविध वयोगटांमध्ये एकेरी, दुहेरी तसेच मिश्र दुहेरी (XD) प्रकारात खेळवण्यात येणार आहे. १७ वर्षांखालील व १५ वर्षांखालील मुले व मुली या गटांमध्ये एकेरी, दुहेरी व मिश्र दुहेरी स्पर्धांचा समावेश असणार आहे.
१३ वर्षांखालील, ११ वर्षांखालील व ९ वर्षांखालील मुले व मुली या वयोगटांमध्ये एकेरी व दुहेरी प्रकारात सामने खेळवण्यात येतील.
तसेच अनुभवी खेळाडूंसाठी मास्टर्स पुरुष व महिला गटांमध्ये (३५+ व ५०+) दुहेरी व मिश्र दुहेरी स्पर्धांचाही समावेश करण्यात आला आहे.
स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवण्याची १५ जानेवारी २०२६ ही अंतिम तारीख असून, सर्व खेळाडूंनी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अधिकृत संकेतस्थळावर www.mbasso.in या वेबसाईटवरूनच आपली ऑनलाईन नोंदणी करावी, असे आयोजकांनी कळविले आहे.
