निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहिलेल्या पवार पब्लिक शाळेतील ८० कर्मचारी वर्गावर गुन्हा दाखल
कल्याण: कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६चे कामकाज पारदर्शक रितीने व सुरळीतपणे व विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी यांनी शासकीय, निमशासकीय अधिकारी कर्मचारी, शाळा, महाविद्यालय यांच्या आस्थापना वरील शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांची सेवा अधिग्रहित केलेली आहे.
या निवडणूक कामकाजाकरिता पवार पब्लिक स्कूल, पलावा डोंबिवली (पूर्व) या शाळेतील एकूण ८० कर्मचारी वर्गास निवडणूक कामकाजाकरिता आदेश बजावण्यात आले होते. तसेच संबंधितास वेळोवेळी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून निवडणूक कर्तव्यावर हजर होण्याकरीता कळविण्यात आले होते, असे असतानाही या शाळेचे कर्मचारी हे निवडणूक कामकाजासाठी आयोजित केलेल्या प्रशिक्षणास उपस्थित राहिलेले नाहीत. त्यामुळे निवडणूक कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी महापालिकेचे सहा. आयुक्त संदीप रोकडे यांनी पवार पब्लिक स्कूल, पलावा डोंबिवली या शाळेतील ८० कर्मचारी वर्गावर भारतीय न्यायसंहिता २०२३ ते कलम २२३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती महापालिका उपायुक्त वंदना गुळवे यांनी दिली आहे.
१५ व १६ जानेवारीला असलेल्या निवडणूक कामकाजासाठी नियुक्त केलेले अधिकारी कर्मचारी गैरहजर राहिल्यास त्यांचेवरही कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिला आहे.
