५८ वी वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा
मैदान पेटलं, श्वास रोखले! महाराष्ट्रासह बलाढ्य संघांची दिमाखदार आगेकूच
काजीपेठ (तेलंगणा): रेल्वे ग्राउंडवर खेळाडू उतरले आणि मैदानावर अक्षरशः आग ओकली गेली! वेग, चपळाई, अचूक डावपेच आणि अफाट आत्मविश्वास यांचा थरारक संगम अनुभवायला मिळालेल्या ५८ व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो अजिंक्यपद स्पर्धेत पहिल्या दिवसापासून सामन्यांनी रंगत गाठली. तेलंगना खो-खो असोसिएशनच्या वतीने आणि खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने सुरू असलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र पुरुष व महिला संघासह महिलांमध्ये पश्चिम बंगाल, हरयाणा, पंजाब तर पुरुष गटात दिल्ली, छत्तीसगड, विदर्भ, पॉंडिचेरी, उत्तर प्रदेश व गुजरात या बलाढ्य संघांनी प्रतिस्पर्ध्यांना धुळ चारत विजयी आगेकूच दिमाखात सुरू ठेवली आहे. डावाने आणि मोठ्या गुणांच्या फरकाने मिळालेले हे विजय आगामी हाय-व्होल्टेज लढतींची नांदी ठरत आहेत.
महाराष्ट्राची ‘विजयाची वारी: पुरुष व महिला संघांचा डावाने पराक्रम
महाराष्ट्राच्या दोन्ही संघांनी परंपरेला साजेसा आक्रमक खेळ सादर करत प्रतिस्पर्ध्यांना सावरण्याची संधीच दिली नाही. पुरुष गटात महाराष्ट्राने मणिपूरचा ३१–१६ असा १ डाव व १५ गुणांनी पराभव करत वर्चस्व सिद्ध केले. मध्यंतराला महाराष्ट्राने ३१–८ अशी २३ गुणांची आघाडी, त्यात ड्रीमरनचे ५ गुण निर्णायक ठरले. महाराष्ट्राकडून शुभम थोरात (२.१० मि. संरक्षण, ४ गुण), सुयश गरगडे (१.३० व २ मि. संरक्षण), रूद्र थोपटे (१० गुण) यांनी सलग दमदार कामगिरी करत विजयावर शिक्कामोर्तब केले. मणिपूरकडून एस. रोकेसन (१ मि. संरक्षण) आणि के. एच. सचिन (६ गुण) यांनी लढत दिली.
महाराष्ट्राच्या महिलांचा धमाका: छत्तीसगडवर दणदणीत विजय
महिला गटात महाराष्ट्राने छत्तीसगडला ३५–१२ असा १ डाव राखून २३ गुणांनी पराभूत करत आपली ताकद दाखवली. विशेष म्हणजे, महाराष्ट्राचा एकही खेळाडू बाद झाला नाही. मध्यंतराला २८–६ अशी २२ गुणांची आघाडी, दोन्ही डावात मिळून ड्रीमरनचे ७ गुण मिळाले. या विजयात रेश्मा राठोड (२.१० मि. संरक्षण, ४ गुण), सरीता दिवा (२.१० मि. संरक्षण), अश्विनी शिंदे (१.५० मि. संरक्षण, ६ गुण), प्रियांका इंगळे (१.४० मि. संरक्षण, ६ गुण), मैथिली पवार (१.५० मि. संरक्षण) यांनी चमकदार खेळ केला. छत्तीसगडकडून पायल पटेल (१ मि. संरक्षण) हिने झुंजार प्रतिकार केला.
विदर्भाची वादळी घोडदौड: उत्तराखंडवर निर्णायक मात
पुरुष गटात विदर्भाने उत्तराखंडचा २५–१६ असा १ डाव व ९ गुणांनी पराभव करत पुढील फेरीकडे दमदार पाऊल टाकले. विदर्भासाठी फैज पठाण (१.४० मि. संरक्षण, १० गुण) हा विजयाचा शिल्पकार ठरला. त्याला राहुल सहारा (३.३० व १.३० मि. संरक्षण) आणि यश सदनशिव (२.१० मि. संरक्षण) यांनी भक्कम साथ दिली. उत्तराखंडकडून कोलीशा (१ मि. संरक्षण, ४ गुण) आणि योगेश कुमार (४ गुण) यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.
पंजाबचा ‘धमाका’: गोव्यावर एकतर्फी विजय
महिला गटातील सामन्यात पंजाबने गोव्याचा ३७–४ असा १ डाव राखून ३३ गुणांनी धुव्वा उडवला. पंजाबकडून बांधब कौर (६ गुण), यशदीप (२.३० मि. संरक्षण, ४ गुण) आणि स्नेहप्रीत (३.१५ मि. संरक्षण, २ गुण) यांनी विजयात मोलाचा वाटा उचलला. गोव्याकडून अमिषा (१ मि. संरक्षण) हिलाच मर्यादित यश मिळाले.
इतर सामन्यांचे संक्षिप्त निकाल
पुरुष गट : दिल्लीने सिक्कीमचा १ डाव ८३ गुणांनी (८७–४) पराभव केला. छत्तीसगडने सेंट्रल आर्म्ड पोलिस फोर्सचा १ डाव २६ गुणांनी (३८–१२) पराभव केला. पॉंडिचेरीने चंदीगडचा १ डाव २५ गुणांनी (३७–१२) पराभव केला. उत्तरप्रदेशने जम्मू-काश्मीरचा १४ गुण व ५ मि. १० सेकंद राखून (३४–२०) पराभव केला. गुजरातने त्रिपुरावर १ डाव ३० गुणांनी (४०–१०) मात केली.महिला गट : हरयाणाने बिहारचा ४०–६ असा १ डाव ३६ गुणांनी पराभव केला.
उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती; स्पर्धेला लाभले राजकीय-क्रीडा नेतृत्वाचे बळ
५८ व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचा उद्घाटन समारंभ अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. या प्रसंगी तेलंगनाचे उत्तम कुमार रेड्डी (सिंचन मंत्री), वकिटी श्रीहरी (क्रीडा मंत्री), खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्री. सुधांशु मित्तल, सरचिटणीस श्री. उपकार सिंग, खजिनदार श्री. गोविंद शर्मा तसेच तेलंगणा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष व स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री. जंग राघव रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. मान्यवरांनी खेळाडूंशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या आणि खो-खो या भारतीय परंपरागत खेळाच्या विकासासाठी राष्ट्रीय स्तरावर अशा स्पर्धांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या उपस्थितीमुळे उद्घाटन सोहळ्याला विशेष शोभा लाभली आणि स्पर्धेला नवचैतन्य प्राप्त झाले.
