लोगो विश्वनाथ स्पोर्ट्स मीट
एमआयटी-एडीटी विद्यापीठात क्रिकेट सामन्यांची रोमांचक सुरुवात
एमआयटी एसओसी, मॉडर्न लॉ कॉलेजची विजयी सलामी
लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन अँड टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे यांच्या वतीने आयोजित आठव्या विश्वनाथ स्पोर्ट्स मीट (व्हीएसएम–२०२६) या देशातील सर्वांत मोठ्या राष्ट्रीय आंतरमहाविद्यालयीन/आंतरविद्यापीठीय क्रीडा स्पर्धेतील क्रिकेट सामन्यांना सोमवारी दिमाखदार सुरुवात झाली. एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलात तसेच निकम क्रिकेट अकादमीच्या मैदानावर एकाच वेळी दोन रोमांचक सामने खेळविण्यात आले. यामध्ये यजमान एमआयटी एडीटी एसओसी, लोणी–काळभोर संघाने आळंदीच्या एमआयटी एसीएससी संघावर ३१ धावांनी विजय मिळवला, तर मॉडर्न लॉ कॉलेज संघाने एमआयटी एसओई संघावर १० गडी राखून दणदणीत विजय साकारत स्पर्धेत विजयी सलामी दिली.
स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात एमआयटी एसओसी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. कर्णधार श्रेयस पारवेचा हा निर्णय स्फोटक फलंदाज सुमित हिंगेने सार्थ ठरवला. सुमितने अवघ्या ४२ चेंडूंमध्ये ८ चौकार व २ षटकारांसह ७४ धावांची तडाखेबाज खेळी करत संघाला भक्कम सुरुवात करून दिली. त्याच्या खेळीच्या जोरावर एमआयटी एसओसी संघाने निर्धारित १६ षटकांत ४ गडी गमावून १६१ धावांची मोठी धावसंख्या उभारली.
प्रत्युत्तरात एमआयटी एसओसीच्या शिस्तबद्ध व अचूक गोलंदाजीसमोर एमआयटी एसीएससी संघाला धावगती वाढवण्यात मोठा संघर्ष करावा लागला. हर्ष पांडेने २८ चेंडूंमध्ये केलेल्या ४६ धावांच्या झुंजार खेळीनंतरही संघ ७ गडी गमावून केवळ १३० धावांपर्यंत मजल मारू शकला. एमआयटी एसओसीकडून पूर्वविजय सोनीने उत्कृष्ट गोलंदाजी करत केवळ १८ धावांत ४ बळी घेत सामन्याचा कौल बदलला.
दरम्यान, निकम क्रिकेट अकादमीच्या मैदानावर झालेला दिवसाचा दुसरा सामना एकतर्फी ठरला. यात मॉडर्न लॉ कॉलेज संघाने एमआयटी एसओई संघावर पूर्ण वर्चस्व गाजवले. प्रथम फलंदाजी करताना एमआयटी एसओई संघ सुरुवातीलाच अडचणीत सापडला आणि १४ षटकांत अवघ्या ९७ धावांत सर्वबाद झाला. मॉडर्न लॉ कॉलेजकडून संग्राम शेवाळेने २६ धावांत ३ बळी घेत प्रभावी गोलंदाजी केली, तर एमआयटी एसओईकडून श्रेयसने (३४ धावा) एकहाती प्रतिकार केला.
प्रत्युत्तरात मॉडर्न लॉ कॉलेजच्या सलामीच्या जोडीने लक्ष्याचा पाठलाग अत्यंत आत्मविश्वासाने केला. वेदांत भडमुखेने २७ चेंडूंमध्ये ५३ धावांची स्फोटक खेळी केली, तर आर्यन जाधवने २१ चेंडूंमध्ये ४२ धावा करत त्याला भक्कम साथ दिली. अवघ्या ८ षटकांत एकही गडी न गमावता मॉडर्न लॉ कॉलेजने सहज विजय मिळवला. एमआयटी एसओईच्या एकाही गोलंदाजाला सामन्यात प्रभाव टाकता आला नाही.
संक्षिप्त धावफलक :
एमआयटी एसओसी : १६ षटकांत ४ बाद १६१ (सुमित हिंगे ७४ धावा – ४२ चेंडू, रोहित शर्मा नाबाद १७; प्रसाद तापकीर २-३२, यश खरात १-४७) वि.वि. एमआयटी एसीएससी : १६ षटकांत ७ बाद १३० (हर्ष पांडे ४६ धावा – २८ चेंडू, अथर्व शितोळे २३ धावा; पूर्वविजय सोनी ४-१८, सुजल पडवळ २-३४, यश कुमार १-१९); सामनावीर : सुमित हिंगे.
एमआयटी एओई : १४ षटकांत सर्वबाद ९७ (श्रेयस ३४ – २० चेंडू, प्रथमेश तिरपुडे २१; संग्राम शेवाळे ३-२६, ओम जागे २-४, यश बोरकर २-१५, आर्यन जाधव १-२५) पराभूत वि. मॉडर्न लॉ कॉलेज ८ षटकांत बिनबाद ९८ : (वेदांत भडमुखे नाबाद ५३ धावा – २७ चेंडू, आर्यन जाधव नाबाद ४२ धावा – २१ चेंडू); सामनावीर : आर्यन जाधव.
