जॉली जिमखाना कॅरम स्पर्धा
घुफ्रान – आकांक्षा विजयी
विद्याविहार (पश्चिम) येथील घाटकोपर जॉली जिमखान्याच्या वतीने तसेच महाराष्ट्र कॅरम असोसिएशन व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने ३ री घाटकोपर जॉली जिमखाना राज्य मानांकन कॅरम स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. या स्पर्धेत अंतिम सामन्यात मुंबईच्या आंतर राष्ट्रीय कॅरमपटू महम्मद घुफ्रानने ठाण्याच्या आंतरराष्ट्रीय कॅरमपटू झैद अहमदवर विजय मिळवून जेतेपदावर आपले नाव कोरले. या सामन्यात पहिला सेट झैदने २०-८ असा सहज जिंकून सुरुवात अतिशय छान केली होती. परंतु दुसऱ्या सेटमध्ये त्याचे सामन्यांवरील नियंत्रण सैल झाले आणि दुसरा सेट त्याने ६-२५ असा सहजरित्या गमावला. तिसऱ्या व अंतिम सेटमध्ये झैदने सुरुवात छान केली होती. पहिला बोर्ड त्याने १२ गुणांचा मिळवला होता. मात्र त्यानंतर सामन्यावर त्याला पकड बसवता आली नाही. घुफ्रानने आक्रमक खेळ करत त्याला १२ वरच रोखले आणि अंतिम सेट २४-१२ असा जिंकून सामना खिशात टाकला.
महिला एकेरीच्या अंतिम फेरीत ज्येष्ठ आंतर राष्ट्रीय महिला कॅरमपटू संगीता चांदोरकरने या स्पर्धेत दीर्घ काळानंतर अंतिम फेरीत प्रवेश केला होता. आपल्या अनुभवाच्या जोरावर ती या स्पर्धेची विजेती ठरेल असे जाणकारांना वाटत होते. संगीताने पहिला सेट २५-३ असा सहज जिंकून सुरुवातही छान केली होती. मात्र रत्नागिरीच्या युवा कॅरमपटू आकांक्षाने संगीताला अटीतटीच्या झुंजीत पुढील दोनही सेट २०-१२, २२-११ असे हरवून या स्पर्धेत विजय संपादन केला.
या स्पर्धेत आजवरच्या राज्य स्पर्धेतील सर्वाधिक ४६ सलामीची नोंद करण्यात आली. यामध्ये एकंदर ३७ व्हाईट स्लॅम व ९ ब्लॅक करण्याचा विक्रम कॅरमपटूंनी करून प्रेक्षकांची मने जिंकली व कॅरम रसिकांना मेजवानी दिली. महिला एकेरीच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या कडव्या लढतीत सिंधुदुर्गच्या केशर निर्गुणने मुंबईच्या सोनाली कुमारीला १५-२५, १७-१३ व २५-४ हरवले. तर पुरुष एकेरीच्या तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत मुंबईच्या प्रशांत मोरेने पुण्याच्या सागर वाघमारेवर २०-३, २५-८ असा सहज विजय मिळवला.
विजेत्यांना जिमखान्याच्या मानद सचिव मुकेश बादानी, संयुक्त क्रीडा समन्वयक प्रशांत कारिया व धर्मेश मेहता, कॅरम सब कमिटी प्रमुख नितिन ठक्कर, मानद खजिनदार बलवंत संघराजका, कार्यकारिणी सदस्य स्वामिनाथन अय्यर व नलिन मेहता तसेच जिमखान्याचे मथुरादास भानुशाली, राज्य कॅरम संघटनेचे मानद सचिव अरुण केदार, उपाध्यक्ष यतिन ठाकूर, सहसचिव केतन चिखले व मुंबई उपनगर जिल्हा संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष चव्हाण यांच्या शुभहस्ते रोख पारितोषिके व चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
