अनिल ठाणेकर
ठाणे : ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत भाजप – शिवसेना – रिपाई महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सोमवारी प्रसिद्ध भोजपुरी स्टार अभिनेता व खासदार दिनेशलाल यादव उर्फ निरहुआ आणि प्रसिद्ध अभिनेत्री आम्रपाली दुबे ठाण्यात आले होते. या दोन्ही कलाकारांनी ठाण्यातील विविध भागांना भेटी देऊन महायुतीच्या उमेदवारांचा संगीतमय प्रचार केला. निरहुआ याने तर देशभक्ती जागावत भोजपुरी गीतातून ‘कमळ’ आणि ‘धनुष्य बाण’ या चिन्हाला मत देण्याचे आवाहन करीत धमाल उडवून दिली. यावेळी मोठया संख्येने उपस्थित जनसमुदायानेही “भारत माता की जय” च्या घोषणा देत निरहुआला साथ दिली.
ठाणे महापालिका सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून प्रचाराचे नवनवे फंडे राजकीय पक्ष तसेच उमेदवार अजमावत आहेत. सोमवारी तर ठाण्यात भोजपुरी स्टार निरहुआ आणि अभिनेत्री आम्रपाली दुबे यांनी संगीतमय प्रचाराची धुम उडवुन दिल्याने सर्वत्र “ठाणे” शहर चर्चेत आहे. भोजपुरी अभिनेता व मा खासदार दिनेशलाल यादव (निरहुआ) व अभिनेत्री आम्रपाली दुबे यांनी वागळे इस्टेट प्रभाग क्र. १५ मधील इंदिरा नगर नाका, कळवा प्रभाग क्रं. २५ आतकोनेश्वर नगर, मफतलाल मैदान आणि प्रभाग क्रमांक ४ मधील गांधीनगर, नळपाडा, खेवरा सर्कल परिसरात भाजप महायुतीचा साग्रसंगीत प्रचार केला. निरहुआ याने अनेक भोजपुरी गीतांचा नजराणा पेश करून मतदारांशी संवाद साधला. उपस्थितांनी, भारतमाता की जय च्या जयघोषात फेर धरला होता. यावेळी प्रभाग क्रं १५ मधील भाजप महायुतीचे उमेदवार सुरेश चंदू कांबळे, अनिता दयाशंकर यादव, अमित सरैया, प्रभाग क्रमांक ४ मधील भाजपच्या स्नेहा आंब्रे, मुकेश मोकाशी, सेनेच्या आशादेवी सिंह, सिद्धार्थ संजय पांडे तर प्रभाग क्रमांक २५ ड चे उमेदवार ॲड. दीनानाथ पांडे आदी महायुतीच्या उमेदवारांच्या पारडयात भरभरून मतांचे दान टाकण्याचे आवाहन निरहुआ यांनी केले.
